सोलापुरात ३४ व्या राज्य पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन ; ‘माळरान- शिकार पक्षी संवर्धन’ अशी आहे संकल्पना
७, ८, व ९ जानेवारी रोजी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडणार
सोलापूर (प्रतिनिधी) ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन येत्या ७, ८, व ९ जानेवारी रोजी सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित केले असून संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजक डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी दिली.
डॉ. मेतन फाऊंडेशनच्यावतीने आणि सामाजिक वनीकरण व वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त सहकार्याने होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. डॉ. निनाद शहा हे आहेत. तर स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आहेत. वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्घाटक आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते व पुण्याच्या एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या सचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. करोनाविषयक सर्व नियमावलींचे काटेकोरपणे पालन करीत पार पडणाऱ्या या संमेलनासाठी अमरावती व नाशिकहून सायकल फेरी येणार आहे. या सायकल फेरीचे स्वागत पोलीस आयुक्त हरीश बैजल करतील.