तीन मुले असून मुलींनीच दिला आईला खांदा
लिहाखेडी ता. सिल्लोड (प्रतिनिधी) येथील गं.भा.चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले..त्यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत..मोठा मुलगा हनुमंता आनंदा साखळे,कृषी अधिकारी, मधला मुलगा बाळाराम आनंदा साखळे, हाय कोर्टात क्लर्क, तर लहान मुलगा नबाजी आनंदा साखळे कंपनीत नोकरीला आहेत. आईने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ह्या तीनही मुलांना मोठे केले.
नोकरीला लावले पण शुद्ध हरपलेल्या ह्या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार दिला. अतिशय प्रामाणिक, नम्र, गरीब, कष्टकरी असलेल्या आईस मुलांनी सांभाळायला नकार दिल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून चंद्रभागाबाई यांचा सांभाळ त्यांची मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे हे करत होते. इतक्या वर्षांपासून अनेकदा मुलगी व जावई यांनी फोन करून सुद्धा ही तीनही मुलं सख्या आईला साधे भेटायला सुद्धा आले नाहीत की कधी विचारपूस केली नाही.
आज आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ आले व दूरवर उभे राहिले.. सर्वात मोठा मुलगा आलाच नाही..हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी व हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळीनी तसेच नातलगांनी आईच्या प्रेतालासुद्धा मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी आईस खांदा दिला व सर्व अंतिमसंस्कार पूर्ण केले. अंतिम समयी माजी उपमहापौर विजय औताडे यांचेसह परिसरातील नागरिक, नातलग, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे करून आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात, आजारपणात लक्ष न देणाऱ्या,आईला घराबाहेर काढणाऱ्या ह्या मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे तर…लेक सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी सर्वत्र कौतुक होत आहे.