अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाचे १० लाख रुग्ण
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच सोमवारी एकाच दिवसात कोरोनाच्या तब्बल १० लाख रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या कोणत्याही लाटेमध्ये अमेरिकेत आतापर्यंत केवळ तीन वेळाच इतक्या मोठ्या संख्येने एकाच दिवसात कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत.
सोमवारी जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सोमवारी एकाच दिवशी १० लाख ४२ हजार इतकी रूग्णसंख्या होती. यामध्ये सर्व प्रांतातांमधील कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे की नाही, हे समजू शकलेले नाही.
यामध्ये काही प्रलंबित प्रकरणांचाही समावेश आहे. शनिवारी अमेरिकेतील एक पंचमांश प्रांतांनी कोरोना रुग्णांची नोंद केलेली होती. यापूर्वी गुरुवारी एकाच दिवसात ५ लाख ९१ हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र सोमवारच्या आकडेवारीमुळे अमेरिकेतील आठवड्याची कोरोना रुग्णांची सरासरी आकडेवारी ४ लाख ५० हजार इतकी झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे या आठवड्यातील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोनाविषयीच्या प्रतिसाद पथकाबरोबर आढावा बैठक घेण्याचे ठरवले आहे.