६००० ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई (प्रतिनिधी) तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६००० ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.
पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या ५ हजारपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जातील. अधिकाधिक भागात ही केंद्रे कार्यान्वित झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान आदींची माहिती मिळू शकणार आहे.
शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषिविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी साठीही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.