वयोवृद्धाला पोलीसांनी दिलेला शब्द खरा करून दाखवत दोन आरोपीतांकडून ५० हजार रुपये केले हस्तगत
नंदुरबार (ॠषिकेश शिंपी) पदम हरचंद कोळी (वय- ७५ वर्ष रा . डामरखेडा ता.शहादा जि. नंदुरबार) यांच्या पत्नीचे कोरोना आजारामुळे निधन झाले होते. पत्नीचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांना शासकीय योजनेतून ५० हजार रुपये मंजूर झाले होते. सदरचे ५० हजार रुपये त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा प्रकाशा येथील बँक खात्यावर जमा झाले होते. दि. 02/02/2022 रोजी पदम हरचंद कोळी हे पैसे काढण्यासाठी डांबरखेडा येथून प्रकाशा येथे गेले. त्यांनी बँकेतून पैसे काढले तसेच ते पैसे घेवून घरी परत जात असतांना त्यांना तहान लागली. पदम हरचंद कोळी हे तुंबा कोळी याचे हॉटेलवर पाणी पिण्यासाठी थांबले असतांना त्यांचे पिशवीत ठेवलेले ५० हजार रुपये हे शेजारी नसल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. त्यामूळे सदरचे पैसे कोणी तरी चोरून नेले असावेत याबाबत त्यांची खात्री झाली. म्हणून त्यांनी शहादा पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरूध्द् चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, यांनी रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांचेशी घडलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना गुन्हा उघडकिस आणणेकामी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले. मिळालेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शहादा, तळोदा, प्रकाशा येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथके शहादा, तळोदा, प्रकाशा, बोरद इत्यादी गावात जावून माहिती काढत होते परंतु उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती.
दि. ०६/०२/२०२२ रोजी रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 02/02/2022 रोजी प्रकाशा येथून वयोवृध्दाचे पैसे चोरणाऱ्या इसमाने डोक्यावर इंग्रजीत ‘PUSHPA’ असे केस कटींग करून कोरलेले आहे, अशी त्रोटक माहिती मिळाली होती. रविंद्र कळमकर यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देवून आरोपीताचा शोध घेणकामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथके ही तळोदा , शहादा तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात जावून हेअर कटींग दुकानात जावून मिळालेल्या बातमी प्रमाणे माहिती काढत होते. परंतु पुष्पा हा हिंदी सिनेमा नूकताच प्रदर्शीत झालेला असल्यामूळे ग्रामीण भागातील तरूणांमध्ये अशी हेअर स्टाईल ठेवण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे आरोपी निश्चित करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अनेक अडचणी येत होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नव्हते. कित्येक हेअर सलून दूकाने पालथी घातल्यानंतर एका हेअर सलून दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की अशी कटींग केलेल्या इसमांपैकी एक इसम हा तळोदा भागातील असावा. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता तळोदा परीसर पूर्णपणे पिंजून काढला. छोटा धनपुर येथे मिठू नावाच्या व्यक्तीने पुष्पा अशा नावाची कटींग केलेली असल्याची माहिती मिळाली. त्यामूळे छोटा धनपुर येथे जावून मिळालेल्या बातमीतील वर्णनाप्रमाणे तरुणाची माहिती काढली असता विनोद ऊर्फ मिठू हा त्याच्या शेतात लपून बसलेला आहे असे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुमारे 5 ते 6 दिवसानंतर सदर गुन्ह्यात मिठूच्या रूपाने एक छोटा आशेचा किरण दिसला. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिठू याच्या शेताची माहिती काढून दिनांक 10/02/2022 रोजी मध्यरात्री त्याच्या शेतात सापळा रचला. परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून एक इसम पळतांना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव विनोद ऊर्फ मिठू विरसिंग पवार (वय -२२ रा. छोटा धनपुर ता. तळोदा जि. नंदुरबार) असे सांगितले. त्यास प्रकाशा येथील एका हॉटेलवर एका वयोवृध्द इसमाची केलेल्या चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची चोरी त्याच्याच गावातील त्याचा साथीदार राजू मोवाशे याच्या मदतीने केली असल्याचे सांगितले व तो सद्या तुळाजा ता. तळोदा येथील गाव दिवाळीत गेलेला असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळाजा ता. तळोदा येथे गेले असता गाव दिवाळीत मोठ्या प्रमाणात तरूणांची गर्दी होती. म्हणून पथकाने अत्यंत सावधपणे राजु मोवाशे यास ताब्यात घेतले व त्यांस त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव राजू गिरीष मोवाशे (वय -22 रा. छोटा धनपुर ता. तळोदा जि. नंदुरबार) असे सांगितले. दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून प्रकाशा येथील चोरीबाबत विचारपूस केली असता प्रकाशा येथील चोरीची दखल स्वतः पोलीस अधीक्षक नंदुरबार पी.आर. पाटील यांनी घेतलेली असल्यामूळे आपल्याला पोलीस पकडतील असे समजले होते. म्हणून आम्ही प्रकाशा येथील चोरी केलेले 50 हजार रुपये खर्च न करता ते घरात लपवून ठेवलेले आहे बाबत सांगितले. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपीतांना सोबत घेवून विनोद ऊर्फ मिठु पवार याचे घरातून 32 हजार 500 रुपये व राजू मोवाशे याचे कडून 17 हजार 500 रूपये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केले.
ताब्यात घेण्यात आलेले 1) विनोद ऊर्फ मिटू विरसिंग पवार 2 ) राजू गिरीष मोवाशे यांचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले 50 हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून दोन्ही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिनांक 04/02/2022 रोजी पदम हरचंद कोळी यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे गाडी पाठवून बोलावून घेतले व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी स्वखुशीने वर्गणी करून जमा केलेले 50 हजार रुपये रोख दिले होते व त्यावेळी पदम कोळी यांना शब्द दिला होता की ‘ तुमची रक्कम चोरणाऱ्या चोराला आम्ही लवकरच बेड्या ठोकू व तुमचे चोरी झालेले पैसे देखील हस्तगत करू ‘ असे सांगितले होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदम हरचंद कोळी यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याचीअमंलबजावणी करत दोन्ही आरोपीतांना बेड्या ठोकून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले 50 हजार रुपये देखील हस्तगत केलेले आहे.
अशा प्रकारे नंदुरबार पोलीसांनी अत्यंत किचकट व कोणताही मागमूस नसलेला गून्हा एक आठवड्याच्या आत उघडकीस आणून फिर्यादी वयोवृध्द् इसमाच्या चेहऱ्यावर पून्हा हसू फुलवले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार/ दीपक गोरे, पोलीस नाईक/विकास कापुरे, पोलीस शिपाई विजय ढिवरे यांचे पथकाने केली असून पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रोख 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहिर करून पथकाचे अभिनंदन केले आहे.