महाराष्ट्र
गुरांची वाहतूक करणारे वाहन दुभाजकावर आदळले
धुळे : शहरापासून जवळ असलेल्या लळिंग शिवारातून गुरांची वाहतूक करणाऱ्या मेटाडोअरने भरधाव वेगात मुलांना कट मारला. त्यानंतर हे वाहन दुभाजकावर आदळले. घटनेनंतर वाहन सोडून चालकाने पळ काढला. ग्रामस्थांनी वाहनचालकवर रोष व्यक्त केला.
या प्रकरणी उशिरापर्यंत मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लळिंगकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या मेटॅडोअरमधून गुरांची वाहतूक केली जात होती. लळींग गावाजवळ या वाहनाने लहान मुलांना कट मारला. त्यानंतर काही अंतर पुढे जाऊन चालकाने महामार्गावरील दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर चालकाने पळ काढला. त्यापूर्वी काही संतप्त गावकऱ्यांनी चालकावर रोष व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर मोहाडी पोलिस दाखल झाले. या वाहनातून ८ गुरे जप्त करण्यात आली. तसेच पोलिस आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.