सिल्लोड येथील मोफत नेत्र तपासणी व शास्रक्रिया शिबिरात २७०० रुग्णांची तपासणी
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते आयोजन
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित मोफत नेत्र तपासणी, उपचार व शास्रक्रिया शिबिरात जवळपास २७०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी अंती २५५ रुग्णांवर नेत्र शास्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना नवदृष्टी मिळाली आहे. नेत्र शास्रक्रिया झालेल्या रुग्णांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मोफत काळे चष्मे तसेच ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. शनिवार (दि.११) रोजी दुसऱ्या टप्यातील रुग्णांवर यशस्वीपणे नेत्र शास्रक्रिया पार पडली.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड नगर परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय , शिवसेना- युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमांच्या अनुषंगाने शिबिरात गर्दी होऊ नये यासाठी दि. ९ डिसेंबर, १६ डिसेंबर, २३ डिसेंबर, ३० डिसेंबर व १० जानेवारी २०२२ अशा एकूण ५ टप्यात रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यानंतर दि. ३१ डिसेंबर व ११ जानेवारी २०२२ रोजी दोन टप्यात तपासणी अंती रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना शिवसेना – युवासेनेच्या वतीने मोफत जेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
सदरील शिबिरात रुग्णांवर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया होऊन ते घरी परतले आहेत. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता चांगल्या पद्धतीने डोळ्यांची शास्रक्रिया यशस्वी झाली असून डोळ्यांनी आता चांगले पाहता येत आहे अशी प्रतिक्रिया रूग्णांनी व्यक्त केली . कोरोना सारख्या संकटात डोळ्यांची तपासणी व शास्रक्रिया कशी करावी यासाठी पैसे कोठून आणावे असा प्रश्न होता. मात्र राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्यामुळे ही नवदृष्टी मिळाली असल्याची भावना देखील यावेळी रुग्णांनी व्यक्त केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, नेत्र तज्ञ डॉ. वैष्णव, डॉ. विसपुते, डॉ. राशीद खान, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मोहंमद हनिफ, दीपाली दत्तात्रय भवर, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यासह नगर परिषद व आरोग्य विभागाचे कर्मचारी , शिवसेना – युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



