‘युवक महोत्सवामुळेच मिळाली अभिनय व दिग्दर्शनाची प्रेरणा’ : दिग्दर्शक मकरंद चौधरी
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने मकरंद चौधरी (सहाय्यक दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर, चित्रपट व टीव्ही मालिका अभिनेता, मुंबई) यांचे ‘शॉर्टफिल्म,चित्रपट व डॉक्युमेंटरीसाठी लेखन’ या विषयावर ‘ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे ऑनलाईन उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे, एम.टी.शिंदे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख डॉ.एच.जी.चौधरी आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे यांनी केले. या कार्यशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक अशा जिल्ह्यांमधून जवळपास ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मकरंद चौधरी (सहाय्यक दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर, चित्रपट व टीव्ही मालिका अभिनेता, मुंबई) हे ‘शॉर्टफिल्म,चित्रपट व डॉक्युमेंटरीसाठी लेखन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘शॉर्टफिल्म बनविण्यासाठी संकल्पना, गोष्ट, संवाद, वेळापत्रक, पात्र व कॅमेरा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. शॉर्ट घेण्यासाठी कमालीचे कौशल्य आत्मसात करावे लागते. शॉर्टफिल्म ही फिल्म प्रोडक्शनची पहिली पायरी असते. स्थळ,वातावरणनिर्मिती, वाचन तसेच अंगाने करावी लागणारी कृती महत्वपूर्ण असतात. डॉक्युमेंटरी लेखनासाठी सविस्तर माहिती जमा करावी लागते. त्यासाठी अभ्यास, मनन, चिंतन, आराखड्याचे परिपूर्ण लेखन या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. मला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित युवक महोत्सव, एकांकिका स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक या स्पर्धांमुळे अभिनयाची तसेच दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली तसेच प्रेरणा मिळाली. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना युवक महोत्सव, पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा या अभिनय कौशल्ये विकसित करणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘शॉर्टफिल्म, चित्रपट व माहितीपट यासारख्या विषयांवर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण बाबी आहेत. यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अभिनयाची व दिग्दर्शनाची बीजे रुजविण्यास मदत होईल. यासाठी महाविद्यालयापासूनच विद्यार्थ्यांची दृकश्राव्य माध्यमासाठी आवश्यक असलेली मूलभूत कौशल्ये विकसित व्हायला हवीत.
या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन डॉ. एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमधून बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी ऑनलाईन उपस्थित होते.