भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल ; भारतीयांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. इंटरनेट सर्च इंजिन गुगलनेदेखील भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे.
गुगलने ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक खास डुडल सादर करून भारताच्या संस्कृती आणि वारशाची एक झलक प्रदर्शित केली आहे. २६ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण जग भारताचा सांस्कृतिक वारसा, सैन्य ताकद आणि विकासाची झलक पाहते आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असते. गुगलने या डूडलला आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये उंट, हत्ती, घोडे, ढोल, तिरंगा इत्यादींचा वापर केला आहे.
गुगलने गेल्यावर्षी ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डुडलच्या माध्यमातून देशातील अनेक संस्कृतींची झलक सादर केली होती. तसेच, ७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगेबिरंगी डुडल सादर केले होते. त्याआधीच्या डुडलमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, विविध कला आणि नृत्यप्रकार देखील पाहायला मिळाले.
कसा असेल आजचा प्रजासत्ताक दिन?
देशाची राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. यासोबतच भव्य परेडचेही आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील.