कोरोनाने मृत झालेल्या पत्नीची रक्कम चोरांनी पळविली
प्रकाशात तो वृद्ध ढसा ढसा रडला
नंदुरबार (प्रतिनिधी) कोरोना या महामारीने मृत्यू झालेल्या पत्नीचे अर्थसहाय्य बँक खात्यावर जमा झाले होते. ती पन्नास हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी मयत महिलेचा वृद्ध पती प्रकाशा येथील बँकेत गेले. त्या बँकेतून वृद्धाने ५० हजार रुपये काढले आणि नातवांसाठी एका हॉटेलवर खाऊ घेत असतानाच ५० हजार रुपयांची ती पिशवी चोरट्यांनी पळवून नेली.
ही घटना दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्नीचे अर्थसाह्य शासनाने दिले मात्र त्याचा चोरट्यांनी ते पळविल्याने तो वृद्ध ढसाढसा रडत बसला. शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पदम हारचंद कोळी यांच्या पत्नीचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. शासनाने कोविड मध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार डामरखेडा येथील पदम कोळी या वृद्धाच्या बँक खात्यात ५० हजार रुपयांची रक्कम जमा देखील झाली होती. ती रक्कम काढण्यासाठी तो वृद्ध जवळच्या प्रकाशा येथील बँकेत दिनांक २ फेब्रुवारी रोजी गेला होता. त्या वृद्धाने उदरनिर्वाह करण्यासाठी बँकेतून 50 हजार रुपयांची रक्कम काढली.
बसस्थानकावर आल्यावर त्याठिकाणी नातवांसाठी एका हॉटेलात खाऊ घेत असतानाच त्यांच्या हातातील पैशांची पिशवी चोरट्यांनी पळवून नेली. घटनास्थळी त्या वृद्धाने आरडाओरड केली. परंतु चोर तेथून पळ काढण्यात यशस्वी झालेत. या घटनेने तो वृद्ध कमालीचा हताश होऊन ढसाढसा रडत बसला. शासनाने दिले मात्र चोरांनी ते पळविले अशी म्हणण्याची वेळ आलीय. या घटनेची आपबिती कथन करण्यासाठी त्या वृद्धाने प्रकाशा येथील पोलिस ठाणे गाठले व तेथे हकीगत सांगितली. पोलिसांनी त्या वृद्धाची फिर्याद नोंदवून घेतली आहे .
प्रकाशा हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बस स्थानक परिसरात नेहमी वर्दळ असते. याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. प्रकाशात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत. हा कलंक पुसून टाकण्यासाठी प्रकाशा पोलिसांनी त्या चोरांचा कसून शोध घेऊन वृद्धाची पळविलेली पन्नास हजाराची रक्कम परत मिळवून देण्याचे आव्हान स्वीकारावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.