आंघोळीची गोळी पोहचली आदिवासी पाड्यात ; शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य, सॅनिटायझर वाटप
धुळे (करण ठाकरे) पर्यावरण रक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित असलेल्या आदिवासी पाड्यांवर अंघोळीची गोळी या संस्थेच्यावतीने साक्री तालुक्यातील आदिवासी पाड्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम संस्थेच्यावतीने करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंघोळीची गोळी या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम तसेच पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीची चळवळ राबविली जाते. वृक्षसंवर्धन,जलसंवर्धन या प्रमुख उद्देशातून सुरू झालेल्या अंघोळीची गोळी या संस्थेने महाराष्ट्राभर जनजागृतीचे उपक्रम राबविलेआहेत. त्या अनुषंगाने साक्री तालुक्यातील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध शैक्षणिक साहित्य तसेच कोरोना प्रतिबंधक सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोकणपाडा, मावचीपाडा, केवडीपाडा, शेनवड, चावडीपाडा, रामपुरा येथील जि. प. शाळेत सदर उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्यबाबत जनजागृती व्हावी म्हणून सॅनिटायझर वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आल्याचे संस्थेचे कार्यकर्ते विकेश बागले यांनी सांगितले. यावेळी आयोजित कार्यक्रमात शेनवड सरपंच दिलीप बारिस, प्राथमिक शिक्षक तुषार गर्दे, अंघोळीची गोळी संस्थेचे कार्यकर्ते विकेश बागले, धनंजय ठाकरे, अजय गांगुर्डे, जीवन भारुडे, सागर बहिरम, विशाल बहिरम, विजय जगताप आदी उपस्थित होते.