तऱ्हावद ते खरवड दरम्यान फरशी पुलाला पडले भगदाड
लोकप्रतिनिधी मस्त, बांधकाम विभाग सुस्त ; नागरिक त्रस्त
बोरद (योगेश गोसावी) तऱ्हावद ते खरवड या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजना या शीर्षकाखाली सन २०१० ते २०११ प्रकाशा, तऱ्हावद, खरवड, बोरद मालदा असे करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याचे काम संबधित ठेकेदाराने अत्यंत चांगले काम केले असल्याने तो रस्ता पुढील पाच वर्षे अत्यंत सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर या रस्त्याची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने थातुर मातुर पद्धतीने डागडुजी करण्यात आली होती. नंतर याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
काही दिवसापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड सीमाताई वळवी यांनी या रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे काढली होती. त्यामुळे तऱ्हावदसह परिसरातील नागरिकांना आशा होती की रस्त्याचे कामही सुरू होईल मात्र तसे झाले नाही. संबधित प्रकाशा ते मालदा रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ९ कोटी अनुदानासह मंजूर असल्याचे बांधकाम विभागाकडून माहिती प्राप्त झाली आहे. मात्र सद्यस्थितीत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा हा महत्वाचा मार्ग असून बोरद, मोड, मालदा, तुळजा, खरवड, तऱ्हावद, खेडले या गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही हा रस्ता तेव्हढाच महत्वाचा असून उसाची वाहतूक ही या रस्त्यांनेच केली जाते. तऱ्हावद पासून काही अंतरावर रस्ता खचला आहे. तसेच तऱ्हावद ते प्रकाशा दरम्यान काटेरी झुडपे ही वाढली आहेत तर मध्येच १ किमी रस्ता अत्यंत खराब असल्याने वाहनधारकांना जिकरीचे झाले आहे. म्हणून संबधित विभागाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करावे अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



