अवधान गावात पाच जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील अवधान गावातील दौलत नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांसह अन्य एक अशा पाच जणांनी एकाच वेळी विष प्राशन करून सामुहीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पाचही जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबधितांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेमागील कारण मात्र समजून आले नाही. घटनेची नोंद मोहाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील दहिवद गावातील मूळ रहिवासी व सध्या अवधान येथील दौलत नगरात वास्तव्यास असलेले गणेश रावल गोपाळ (४२), गोविंदा गणेश गोपाळ (१२), जयश्री गणेश गोपाळ (१४), सविता गणेश गोपाळ (३५), भरत पारधी (२४) या पाच जणांनी काल (दि. २१) दुपारी राहते घरी एकाच वेळी काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी पाचही जणांना उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दाखल केले. त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू करण्यात आले. पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने ही माहिती डॉ. सुरज पवार यांनी रुग्णालयातील पोलिस कर्मचारी एस. एम. सूर्यवंशी यांना दिली. पोकॉ सुर्यवंशी यांनी ही घटना मोहाडी पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे अधिकारी कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अवधान गावात घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्ना मागे नेमके काय कारण आहे. याचा उलगडा होऊ शकला नाही. पाचही रुग्णांवर उपचार सुरू असल्याने त्यांचा जबाब घेतल्यानंतर याबाबत खुलासा करता येऊ शकेल अशी माहिती निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.