अनमोल इंग्लिश मिडीयम स्कूल बोकडविरा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
उरण (विठ्ठल ममताबादे) अनमोल इंग्लिश मिडीयम स्कुल बोकडविरा शाळा सर्व सण अतिशय उत्साहात साजरे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी करताना शाळा ते श्री गणपती मंदिर अशी श्री छत्रपतींची मिरवणूक काढली जाते. दरवर्षी काहीतरी नवीन कार्यक्रम करून छत्रपतींना मानवंदना देण्याचा शाळेचा प्रयत्न असतो.यावर्षी मिरवणूकीवर बंदी असल्याने शाळेतच शिवरायांचा पाळणा अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. तसेच छत्रपतीची आग्राहुन सुटका असे एक नाट्य सादरीकरण करण्यात आले. दोन वर्षाच्या लॉकडाऊन नंतर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतला.शाळेच्या सर्व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
संपूर्ण उरण तालुक्यात कोणतेही डोनेशन न घेणारी एकमेव शाळा असा नावलौकिक असलेली ही शाळा आहे. खूपच कमी फी आणि गरिबांना मोफत शिक्षण देण्याचे काम ही शाळा करत आहे. असे असून सुद्धा कोणतेही ज्यादा शुल्क न घेता प्रत्येक महिन्याच्या दोन शनिवारी योग गुरु प्राजक्ता सरवैया यांचे एक तास योग शिक्षण, दोन शनिवारी स्टेप आर्ट्स डान्स अकॅडेमीच्या तज्ञ नृत्य शिक्षकाकडून डान्सचे प्रशिक्षण, अभिजित कोशे यांच्याकडून चित्रकलेचे विशेष शिक्षण, संगीत विशारद सविता दिघे यांच्याकडून विशेष संगीत शिक्षण, इयत्ता पहिली पासून संस्कृतचे शिक्षण असे विविध उपक्रम, गुण असलेले शाळेचे रोपटे भविष्यात नक्कीच वटवृक्ष होईल यात काहीच शंका नाही.
गुरुकुलच्या ‘धर्तीवर संख्येकडे नाही तर मूल्य जपणे’ हे घोष वाक्य असा निर्धार करत शिक्षण क्षेत्रात उंच शिखर सर करण्याचा आमचा मानस आहे. असे उदगार शाळेचे मुख्याध्यापक अजय कृष्णा पाटील यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.