आहार वाटपात बचत गटांना प्राधान्य द्यावे मंत्र्यांशी चर्चा करणार आ. कुणाल पाटील
धुळे (विक्की आहिरे) धुळे तालुक्यासह जिल्हयातील महिला बचत गटांना आहार वाटपाचे काम प्राधान्यक्रमाने देण्यात यावे यासाठी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना सांगितले. दरम्यान महिला बचत गटाच्या निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन पात्र असलेल्या किमान 25 महिला बचत गटानां गरम ताजा आहार व टी. एच. आर. योजनेत प्राधान्यक्रमाने देण्यात यावे अशी मागणी आ. पाटील यांनी आपल्या पत्राव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
धुळे तालुका, शहर आणि जिल्हयातील महिला बचत गटांना आहार वाटप आणि टी. एच. आर. योजनेत प्राधान्यक्रम देण्यात यावा या मागणीसाठी धुळे तालुक्यातील महिला बचत गटातील प्रतिनिधी व सदस्यांनी आ. कुणाल पाटील यांची भेट घेतली. यावेळी आ. पाटील यांच्याशी चर्चा करतांना बचत गटाच्या प्रतिनिधींनी सांगितले कि, कोरोना आणि त्यामुळे आलेली टाळेबंदी यामुळे बचत गटाचे सर्वच कामे बंद पडली त्यामुळे या बचत गटाच्य सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे टी. एच. आर. योजना व गरत ताजा आहार योजना स्थानिक महिला बचत गटांमार्फत राबविण्याचे निर्देश आहेत. मात्र महिला बचत गटांना डावलून धनदांडग्या व बड्या ठेकेदारांना देत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान याकामी तात्काळ निविदा प्रक्रीया
राबविण्याचे न्यायालयाचे निर्देश असतांना बचत गट अडचणीत कसे येतील आणि निविदा प्रक्रीयेतून बाहेर कसे पडतील असे प्रयत्न करुन दोन वर्ष उलटूनही इतर संस्थेला मुदतवाढ देण्याचा कार्यक्रम बिनदिक्कतपणे राबविला जात आहे. ज्या महिला बचत गटांनी निविदा प्रक्रीया पूर्ण केली आहे अशा गटांना फक्त पाच-पाच अंगणवाड्याचे काम देवून बोळवण केली जात आहे. त्यामुळे बचत गटांना न्याय मिळावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांच्याकडे करण्यात आली.
महिला बालकल्याण मंत्र्यांशी चर्चा
शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, जिल्हयातील व धुळे तालुक्यातील बचत गटांना आहार वाटपात प्राधान्य देण्यात यावे आणि महिला बचत गटांना किमान पंचवीस अंगणवाड्यांची आहार वाटपाची कामे देण्यात यावीत यासाठी महिला बालकल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांची लवकच भेट घेऊन चर्चा करणार आहे. दरम्यान महिला बचत गटांना न्याय मिळावा या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आ. पाटील यांनी दिले आहे. शिष्टमंडळात खोरदड, जुनवणे, शिरुड, बोरीस, गोताणे, चिंचवार, सडगाव, लामकानी, मुकटी, सोनगीर, लोणखेडी, बल्हाणे, कावठी, तरवाडे, अवधान आदी गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.