कृषीपंप, आदिवासी पाड्यातील विजेच्या प्रश्नावर आ. कुणाल पाटील यांची उर्जा राज्यमंत्र्यांशी चर्चा : प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना
धुळे (करण ठाकरे) धुळे ग्रामीण विधानसभा ०६ धुळे आदिवासी पाड्यात तत्काळ नवीन ट्रान्सफार्मर आणि विद्युत जोडणी तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे अतिरिक्त विजभार असलेल्या ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवून देण्याची मागणी आ. कुणाल बाबा पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या उर्जा राज्यमंत्र्यांच्या बैठकित केली.
दरम्यान ६३ के. व्ही. ए. ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त विजभार झाले असेल तर बाजूलाच दुसरा ट्रान्सफार्मर बसवून तो विजभार विभागून समस्या मार्गी लावण्याचे आदेश उर्जा राज्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. धुळे जिल्हयातील एचव्हीडीएस (उच्च व्होल्ट विद्युत वितरण पध्दती) कामांचा आढावा व आदिवासी पाड्यांमध्ये बीज जोडणीबाबत आज दि. २ फेब्रुवारी रोजी दु. १२ वा मुंबईत उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात धुळे ग्रामीणचे आ. कुणाल बाबा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकित २०० ते ६०० मीटरच्या आत असलेल्या ग्राहकांसाठी उच्चदाब वितरण पध्दतीचा पर्याय असून ३० मीटरच्या आत सर्व कृषीपंप ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देण्यात येत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बीज जोडणी धोरणाचा आढावा घेतला. अधिक्षक अभियंता धुळे यांनी सांगितले कि, वीज बील भरणा रक्कमेतून निर्माण झालेल्या कृषी अकस्मितता निधी अंतर्गत धुळे तालुक्यासाठी ३ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून या निधीतून नवीन कृषी विद्युत जोडण्या देण्याचे काम सुरुआहे. शिवाय ६३ केव्हीए. ट्रान्सफार्मरच्या जागी १०० के व्ही. ए. ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी त्या ठिकाणी किमान २ नवीन ग्राहकांनी बीज जोडणी मागितली पाहिजे ही कामेही या निधीतून होणार असल्याचे सांगितले.
आदिवासी पाड्यामध्ये नवीन ट्रान्सफार्मर आणि विद्युत जोडणी देण्याबाबत तातडीने कार्यावाही करण्याच्या सुचना उर्जा राज्यमंत्र्यांनी दिल्या. धुळे तालुक्यातील रतनपुरा येथील लाहीपाडा आदिवासी वस्तीत इलेक्ट्रीक पोल व ट्रान्सफार्मरबसविण्याच्या कामासाठी ३७ लक्ष रुपये निधीची आवश्यकता असून ते काम २०२२ २३ च्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंत्यांनी सांगितले. आ. कुणाल बाबा पाटील यांनी यावेळी धुळे तालुक्यातील बार येथील प्रस्तावित १३२ के. व्ही. उपकेंद्राबाबत विषय मांडला. राज्यमंत्री ना. तनपुरे यांनी या उपकेंद्राचे अंदाजपत्रक तीन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. सदर उपकेंद्राचे अंदाजपत्रक तयार असून मुख्य कार्यालयातून काही त्रुटी काढल्या होत्या. त्या पूर्ण करुन सदरचे अंदाजपत्रक पाठवणार असल्याचे सांगितले. शेतकर्यांनी आपल्याकडील थकबाकी भरली तर महावितरण कंपनीला विज वितरणातील विकास कामे करणे सोपे होईल.
दरम्यान कृषी अकास्मितता निधी वाढविण्याचे आदेश यावेळी उर्जा राज्यमंत्र्यांनी दिले. आ. कुणाल बाबा पाटील यांनी अतिरिक्त भार झालेल्या ट्रान्सफार्मर बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्र्यांनी ६३ के. व्ही. ए. ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त विजभार झाले असेल तर बाजूलाच दुसरा ट्रान्सफार्मर बसवून तो विजभार विभागून समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. या बैठकिला महावितरण व्यवस्थापकिय संचालक, प्रकल्प अधिकारी, धुळे, संचालक महावितरण, कार्यकारी संचालक महावितरण, मुख्य अभियंता, जळगाव, अधिक्षक अभियंता धुळे उपस्थित होते. सदर बैठकीत धुळे येथील अधिक्षक अभियंता वीज वितरण यांचे कार्यालयातून कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, आर. एम. पाटील, उपअभियंता चव्हाण, असमार, आ. कुणाल बाबा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, स्विय सहाय्यक सतिष जोशी उपस्थित होते.