जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समितीची त्रेमासिक ऑनलाईन बैठक संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची तिसरी सभा जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष मा अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखली पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी सभेचे प्रास्ताविक केले व तंबाखू नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीबाबतीत केल्या गेलेल्या कारवाईची माहिती त्यांनी सदस्यांना दिली.
जिल्ह्यात १० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय येथील तंबाखू मुक्ती केंद्रातून १४१२ लोकांना समुपदेशन करण्यात आले असून त्यापैकी १५४ लोकांनी तंबाखू चे व्यसन सोडले आहे. जिल्ह्यातील ११०३ शाळा सर्व निकष पूर्ण करून सलाम मुंबई फाऊंडेशनचे ॲपवर तंबाखू मुक्त झालेल्या दिसत असून पारोळा, भडगाव, बोदवड हे तालुके गट शिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नातून अग्रस्थानी आहेत. असे समितीचे सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांनी सांगितले. तसेच १६६ लोकांवर कलम ४ अंतर्गत दंडात्मक कारवाई करून ४७१० रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस प्रशासन कडून ₹२९८००/- च्या विदेशी बनावटीच्या सिगारेट व जवळपास ₹२४०००/- चा माल कलम ७ अंतर्गत जप्त करण्यात आला आहे.
उपहारगृहात, तसेच सर्व सार्वजनिक शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि थुंकणाऱ्यांवर कोटपा कलम ४ व पोलीस अधिनियम कलम ११५,११६ नुसार तसेच शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिघात असलेल्या तंबाखू विक्री करणारे आणि १८ वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोटपा कलम ६ अ, ब आणि बाल न्याय कायदा कलम ७७ (juvenile justice Act Section 77) नुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
तंबाखू उत्पादनाच्या वेष्टन वर सचित्र धोक्याचा इशारा नसलेली उत्पादने उत्पादन, साठवण करणारे व विक्रेत्यांवर कोटपा कलम ७ नुसार कारवाई करण्याचेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
यावेळी सभेसाठी जिल्हा माहिती अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, वस्तू व सेवा कर अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या प्राचार्या आणि जन मानवता फाऊंडेशन, मुक्ती फाऊंडेशन, सलाम मुंबई फाउंडेशनचे जळगाव जिल्हा समनव्यक संदीप खरात सोबत विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी व तंबाखू नियंत्रण कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव आपल्या अधिकारी कर्मचारी सोबतच येणाऱ्या जनतेस करून द्यावी व तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन डॉ. एन एस चव्हाण यांनी केले.