रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे शालेय मुलींना देण्यात आले स्वसंरक्षणाचे धडे
चोपडा (विश्वास वाडे) रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यावतीने उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणासाठी जीवन संरक्षण प्रकल्प या अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चोपडा येथील पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रशिक्षक संजय पाटील यांनी विद्यार्थिनीना संकटाच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे या बाबतीत वेगवेगळ्या क्लृप्त्या व धडे दिले.
विद्यार्थिनींना प्रत्येक संकटाचा सामना करता यावा, निर्भय होऊन समाजात ताठ मानेने जगता यावे, विद्यार्थिनींना व्यक्तिमत्व विकास साधता यावा, विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन रडायचं नाही तर लढायचं हा संदेश देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे काम चोपडा रोटरी क्लबने सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मानसिक पाठबळ देण्याच्या प्रयत्न रोटरी क्लबने निश्चितच केला आहे. व्यक्तिमत्व विकास वाढीबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे घेऊन अन्याय, अत्याचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य अंगीकारता येऊ शकते, असे मत चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी व्यक्त केले.
सुरुवातीस रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांनी जीवन संरक्षण अंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे महत्त्व व प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सचिव रोटे प्रवीण मिस्त्री, प्रकल्प प्रमुख रोटे नरेंद्र तोतला यांसह रोटे चेतन टाटिया, रोटे अर्पित अग्रवाल, रोटे नयन महाजन आदी रोटेरियन उपस्थित होते. सुमारे तीनशे विद्यार्थिनींनी सदर शिबिराचा लाभ घेतला.