ग्रंथ मानवी जीवनाला योग्य मार्ग दाखवतात ; ह.भ.प. भाऊसाहेब सोमनाथ पुंडे यांचे प्रतिपादन
आर्वी ता. धुळे (करण ठाकरे) ग्रंथ हेच मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवणारे वाटाडे आहेत, म्हणून विद्यार्थी दशेपासून ग्रंथ वाचन, तसेच संतसाहित्याचे वाचन मुलांनी करायला हवे. असे प्रतिपादन ह.भ.प. भाऊसाहेब सोमनाथ मुंडे यांनी केले. मालेगाव तालुक्यातील कंधाणे येथील ह.भ.प. प्रकाश महाराज गांगुर्डे यांच्या दमोताई वारकरी गुरुकुलाला पुंडे यांनी ज्ञानेश्वरीच्या पन्नास पाटायण प्रती भेट दिल्यात. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ह.भ.प. प्रकाश महाराज गांगुर्डे हे गेल्या अनेक वर्षापासून ते विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व विकासाची उन्हाळी शिबिरे घेत होते. त्यातूनच दमोताई वारकरी गुरुकुल संस्था कार्यरत झाली आहे. गुरुकुलात सद्या जवळपास तीस ते पस्तीस विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. शासनाचे कुठलेही अनुदान गुरुकुलास नसल्याने ही संस्था फक्त दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीवर चालते. आर्वी येथील सेवा सोसायटीचे सचिव, वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक नेहमी गोरगरीबांना मदतीचा हात देणारे, विठ्ठल मंदिरात दोन्ही वेळेस हरिपाठ आरतीने संपूर्ण गावांचे वातावरण मनमोहक आणि भक्तीमय करणारे, दानशूर व्यक्तीमत्व सोमनाथ भाऊसाहेब पुंडे यांनी नुकतीच दमोताबाई वारकरी गुरुकुलास एक दुभती गाय, एकावन्न ज्ञानेश्वर पारायण प्रती, सात नगरी टाळांची जोड भेट म्हणून दिली आहे. ही भेट बघुन गुरुकुलातील विद्यार्थी भारावून गेले, कारण वारकरी संप्रदायात टाळं आणि मृदंगाची जोड असल्याशिवाय हरिपाठ हरिभजन होत नाही, तसेच वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी ग्रंथाला खूप मोठे महत्त्व आहे. तसेच गाय आणि माय हीच खरी सेवा वारकरी संप्रदायात सांगितली जाते. या गुरुकुलात काही दानशूर व्यक्ती आपला वाढदिवस येथील मुलांसोबत साजरा करून मुलांना स्नेहभोजन देत असतात. कोणी आपल्या आई वडीलांच्या पुण्यस्मरणार्थ मुलांना स्नेहभोजन व गायनासाठी लागणारे साहित्य भेट म्हणून देतात. गुरुकुलातुन अनेक विद्यार्थी घडविले गेले आहेत. याठिकाणी सर्व गरीब कुटूंबातील मुले आहेत. त्यांचे पूर्ण पालनपोषण दमोताई वारकरी गुरुकुला मार्फत केले जाते, असे ह. भ. प. प्रकाश महाराज गांगुर्डे यांनी सांगितले. गुरुकुलातर्फे प्रकाश महाराज यांचेकडून भाऊसाहेब पुंडे यांचा सत्कार करण्यात आला.