केंद्राने जर पारदर्शकपणे सर्व नेत्यांची चौकशी केली तर अर्धे भाजपचे पुढारी जेल मध्ये जातील ; अब्दुल सत्तार यांचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन
फुलंब्री : केंद्रातील भाजप सरकारने जर पारदर्शकपणे सर्व नेत्यांची चौकशी केली तर भाजपचे अर्धे पुढारी जेल मध्ये जातील असा घणाघात महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केला. तर काही लोकांची दुकाने बंद पडली असल्याने त्यांनी आता लाऊडस्पीकर ची दुकाने सुरू केल्या असल्याचा टोला ना. अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे यांना लगावला.
भाजप सरकार महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांना टार्गेट करून महाराष्ट्राची बदनामी करीत असल्याचे स्पष्ट करीत भाजपच्या या अनागोंदी कारभाराचा समाचार घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे येत्या 8 जून रोजी औरंगाबाद येथे येत असून या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येत्या 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. यासभेच्या पूर्व तयारी साठी तसेच भाजपच्या ढोंगी नेतृत्वाची पोलखोल करण्यासंदर्भात फुलंब्री येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जाहीर सभेचे बुधवार (दि.1) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, अक्षय खेडकर, शिवसेना शहरप्रमुख उमेश दुतोंडे, नगरसेवक रउफ कुरेशी, रमेश दुतोंडे , उप तालुकाप्रमुख सोमिनाथ करपे, युवासेना तालुकाप्रमुख राजू तायडे, उपविभाग प्रमुख अंकुश ताठे, जगन्नाथ पवार, राधकीसन कोलते, संजय मोटे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखाताई परदेशी, उपजिल्हाप्रमुख दुर्गाताई भाटी, तालुकाप्रमुख मंगलाताई कापरे , पैठण तालुकाप्रमुख ज्योती पठाडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
फुलंब्री शहराच्या विकासासाठी निधी दिला होता मात्र भाजपच्या ताब्यात असलेल्या नगर पंचायतीने यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही असे स्पष्ट करीत फुलंब्रीचा रखडलेला विकास व दुषित पाणी पुरवठ्यामुळे येथील जनता त्रस्त असून येत्या निवडणूकित येथे सत्ता बदल करून शिवसेनेला विकासाची संधी द्या असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. फुलंब्री शहरासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना मिळवून देऊ यासह फुलंब्री शहराला लागून असलेल्या पानवाडी येथे पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 5 कोटी तर फुलंब्री शहरात विकास कामांसाठी 7 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू राठोड, राजेंद्र ठोंबरे, किशोर बलांडे, रेखाताई परदेशी आदींनी मनोगत व्यक्त केले.