स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज
चोपडा (मयुरेश्वर सोनवणे) प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाने वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. आणि तो सोन्याचा दिवस फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी उजाडला.शिवनेरीच्या नगारखान्यात सनई,चौघडा वाजत माता जिजाऊच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला.
छत्रपती शिवराय म्हणजे भारतीयांच्या हृदयसिंहासनावर विराजमान महान विभूतीमत्व.वैश्विक पातळीवर महाराजांच्या विचारांचा पायंडा आजही घुमतामा दिसतो.महाराजांचे नाव घेताच बाहू स्फुरण पावतात.जोश निर्माण होतो.”जय शिवाजी”चा नारा विरश्री जागृत करतो. महाराजांच्या कर्तृत्वाला जागतिक इतिहासात मान आहे.जनमानसात परमेश्वरतुल्य स्थान आहे.एखादा महापुरूष या जगातून निघून गेल्यानंतर त्याच्या कार्याचा,विचारांचा या समाजावर किती परिणाम झाला हा त्या महापुरुषाचा थोरपणा ठरवतो.भारताचे राजकारण,समाजकारण,धर्मकारण, प्रशासन, युद्धशास्त्र अशा महत्वाच्या बाबींवर महाराजांच्या कार्याचा प्रभाव दिसतो.शिवराय हा शब्द पराक्रम,धैर्य,आत्मविश्वास,पावित्र्य, मांगल्य, प्रजाहित दक्षता,सर्व जातीधर्म समभाव इत्यादींचा पर्यायी शब्द बनलेला आहे.शिवाजी हे उत्तमोत्तम विविध गुण वैशिष्ट्यांचे, क्षमतांचे,योग्यता, मुल्यसमुच्चयाचे नाव आहे.
जिजाऊंनी शिवरायांना सुसंस्कृत केले.सोबत शहाजी राजे,बाजी पासलकर, जेधे,संत तुकाराम यांनी विविध शिक्षण दिले. मराठी सोबत संस्कृत,कन्नड,तेलगू, हिंदी,उर्दू या भाषा लहानपणीच अवगत झाल्या. महाराजांनी राजव्यवहार कोष तयार करून शिवशाहीचा कारभार मराठीत केला.
हिंदू धर्मासोबत इतर धर्मांचा आदर केला.महाराजांचा लढा धार्मिक नव्हता तर राजकीय होता. मोगलशाही, आदिलशाही, विजापूरकर, चंद्रराव मोरे, निंबाळकर, मोहीते, सावंत,दळवी, सुर्वे आदिंविरुद्ध न्यायासाठी लढले.स्वारीच्या धामधुमीत कुराणाची एखादी प्रत सापडली तर सन्मानपूर्वक परत करत.स्वराज्य निर्मितीत अनेक मुस्लिम सहकाऱ्यांचा वाटा होता.मदारी मेहतर शिवरायांचे विश्वासू सहकारी. आग्र्यावरून महाराजांची सुटका करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.पाठ फुटेपर्यंत मार खाल्ला पण मोगल सत्तेला महाराजांची दिशा सांगितली नाही.काझी हैदर वकील तर खाजगी सचिव होते.दौलतखान आरमार प्रमुख, शमाखान सरदार,नुरखान बेग पहिले सरनौबत.सिद्धी इब्राहीम अंगरक्षक, रुस्तमेजमान, इब्राहिमखान, दाऊतखान,मीर मोहम्मद असे कितीतरी सैनिक मुस्लिम होते पण धर्म द्वेष पुढे आला नाही.
महाराजांनी ब्रह्महत्यापाप हे हिंदू धर्मातील सूत्र मानले नाही.राज्याभिषेक वेळी हिंदू धर्मातील धार्मिकविधी करणाऱ्या पुरोहितांनी त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेक करण्याचे नाकारले.कारण राजा हा ब्राह्मण किंवा क्षत्रियच होवू शकतो.शुद्राला राजा होण्याचे अधिकार नाहीत.म्हणून थेट काशीवरून गागाभट्ट नावाचे पुरोहित आणले व राज्याभिषेक करून घेतला. हिंदू धर्मात समुद्र ओलांडणे पाप मानले जाई पण दुरोगामी विचार करून आरमार उभारले.इंग्रज,डच,फ्रेंच,पोर्तुगीज या शत्रूच्या आधी त्यांनी सागरी किल्ले,सागरी आरमार उभारले.
शत्रुच्या स्त्रियांचा सन्मान करा ,अन्याय करू नका अशी ताकीद देवूनही रंझेगावच्या वतनदार पाटलाने गरीब कुणब्याच्या मुलीवर बलात्कार केला तेव्हा त्याचे हात तोडले.सकुजी गायकवाड या सेनापतीने बेलवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचेवर बलात्कार केला होता त्याचे डोळे फोडून आजन्म कारावासाची शिक्षा दिली.यातून स्त्रियांबद्दल आदर दिसून येतो.
महाराजांनी शेतकऱ्यांना सवलती आणि संरक्षण दिले.शेतीला मोफत पाणीपुरवठा,आवश्यक बी वी बियाणे ,कर्ज,आर्थिक मदत दिली.शेतकऱ्याच्या शेतातील गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नका असा आदेश काढून कडक अंमलबजावणी केली. स्वराज्याप्रती निष्ठा ठेवणारा,स्वराज्य संकल्पनेला बळ देणारा,न्यायनितीला वागणारा कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो महाराजांनी त्याला आपले मानले.या बाबींना न जुमाननारा नात्यागोत्यातील जरी असेल त्याला ठार केले. स्वराज्य निष्ठा हाच त्यांचा मुख्य निकष होता.
अफजलखानाचा वध,शाहिस्तेखानाची बोटे लाल महालात कापणे, सिद्धी जौहरच्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका, आग्र्यातुन सुटका हे प्रसंग साहस,धैर्य,आत्मविश्वास,कर्तुत्व दर्शवतात. मिर्झाराजे जयसिंगसमोर हार पत्करणे,आग्र्याला जावून कैद होणे,अपमान होणे हे संकटांमधून पराभवातून महाराजांचे व्यक्तिमत्त्व अधिक उजळून निघाले.
छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातीच्या लोकांचे बहुजनांचे राजे होते. महात्मा फुले त्यांचा कुळवाडी भूषण म्हणून गौरव करतात.आपणही महाराजांच्या विचारांवर,बुद्धीचातूर्याचा विचार करत,भविष्याचा वेध घेत आधुनिक जगात वावरले पाहिजे.थोडक्यात शिव विचारांच्या रस्त्यावर चाललो तर स्वतःचे जीवन उज्ज्वल करता येईल. अशा महापराक्रमी, प्रतिपालक, धीरोदात्त, कुशाग्रबुद्धिमतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
मयुरेश्वर रोहिदास सोनवणे
उपशिक्षक, बालमोहन विद्यालय, चोपडा.