राजकीय

भाजपा शासन काळातील भानगडी झाकण्यासाठी फडणवीसांकडून विधानसभा पटलाचा गैरवापर : अनिल गोटे

धुळे (प्रतिनिधी) विधानसभेच्या घटनात्मक संरक्षणाचा दुरुपयोग करून देवेंद्र फडणवीसांनी काल केलेला आदळआपट आणि आक्रस्ताळेपणा हे सर्व त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडात केलेल्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येऊ नयेत याकरिता केलेली नौटंकी होय. केंद्रातील तपास यंत्रणेचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावूनही काहीच साध्य होत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले. विरोधकांचा एकही नेता झुकत नाही, ईडी फिडीला दाद देत नाही, धमक्यांना भीक घालत नाही याची देवेंद्र फडणीस यांना पुरेपूर कल्पना आलेली आहे. सत्ताकाळात केलेला भ्रष्टाचार, बेकायदेशीर व नियमबाह्य आदेशाची मालिका, भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना दिलेले संरक्षण, इत्यादी भानगडी बाहेर येऊ नयेत याआधीच आपण कांगावा व बोंबाबोंब करून मी म्हणतच होतो, मला याची कल्पना होतीच, अशी उलटी बोंबाबोंब करता यावी, यासाठीच विधिमंडळात कालचा केलेला बनाव होता. सत्ताधारी पक्षांना दबावाखाली आणायचा केलेला प्रयत्न याशिवाय त्याला फार महत्त्व देता येत नाही व शासनाने सुद्धा देऊ नये, असे पत्रक अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासाचे रेकॉर्डिंग केल्याचे काल विधानसभेत सांगितले. 125 तास म्हणजे ५ दिवस होतात. म्हणजेच आम्ही सकाळी प्रात:र्विधीला गेलेपासून ते झोपायला जाईपर्यंत किंवा नंतर सुद्धा फडणवीसांना रेकॉर्डिंग करण्यात कोणती मजा येत होती ? असा प्रश्न उपस्थित करून अनिल गोटे पुढे आपल्या पत्रकात म्हणतात की, सत्ता गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस व त्यांची टोळी किती रिकामी राहिली ? हे काल महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले असेलच. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या बेकायदेशीर गैरव्यवहारांची व भ्रष्टाचाराची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांचे मनच त्यांना खात आहे. त्या वैफल्य व नैराश्यग्रस्त अवस्थेतून देवेंद्र फडणवीसांमधली गुन्हेगारी प्रवृत्ती काल महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली आहे. महाराष्ट्रात डझनावारी मुख्यमंत्री आले व गेले पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावणारा हा पहिलाच माजी मुख्यमंत्री असेल.

राकेश कुमार वाधवान याच्या कंपनीत इक्बाल मिरची हा भागीदार होता, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे सन २०१४-१५ मध्ये रुपये १० कोटी व सन २०१७-१८ मध्ये पुन्हा १० कोटी अशी देणगी उर्फ खंडणी गोळा केल्याचे प्रकरण बाहेर येताच फडणवीसांनी आपला बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याचा केविलवाणा प्रकार काल महाराष्ट्राच्या जनतेने पहिला. देवेंद्र फडणवीस यांनी जेवढा सत्तेचा दुरुपयोग केला तेवढा अन्य कुठल्याही मुख्यमंत्र्याने केलेला नाही. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपामधील भ्रष्ट मंत्र्यांना क्‍लीन चिट देण्याचा कारखाना त्यांनी काढला होता. यामागील सत्य उजागर होऊ नये व आपले पाप झाकले जावे त्यासाठी केलेले प्रयत्न याशिवाय माझ्या लेखी या प्रकरणास फार महत्त्व नाही, असे खरमरीत पत्र अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे