बंडखोर महिला आमदारांना वेश्या म्हणणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील : संजय शिरसाट
मुंबई : बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विविध प्रकारचे आरोप आणि टीका केली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “बंडखोरांनो तुम्ही विकले आहात, त्यापेक्षा कामठीपुऱ्यात पाटी लावून उभं राहा” अशा आशयाचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. याच विधानाचा समाचार संजय शिरसाट यांनी घेतला आहे.
त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, “हे मूर्ख लोक अशाप्रकारचं वक्तव्य कसं करतात? याचंच आम्हाला वाईट वाटतं. अशी टीका करण्याचा त्यांना अधिकार काय आहे. त्यांच्यापेक्षा फार कडवट आम्ही बोलू शकतो. पण यांना लाज वाटली पाहिजे. बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये ४ महिला आमदार होत्या, असं असताना त्यांनी आम्हाला वेश्या म्हटलं.”
संजय राऊतांना उद्देशून बोलताना शिरसाट पुढे म्हणाले की, “बंडखोरी करणाऱ्यांमध्ये तुझी बहीण किंवा आई असती, तर तू असा बोलला असता का? बंडखोर महिलांना वेश्या म्हणणाऱ्यांना एकेदिवशी लोक जोड्याने मारतील. या आमदार महिला कुणाची तरी बायको, कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी लेक आहे. त्यांना वेश्या म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र सहन करेन का? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी विचारला आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर बंडखोर महिला आमदार रडल्याचंही त्यांनी सांगितलं. “हीच शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे का? एक दिवस येईल, आता त्यांना त्यांची लायकी कळेल,” असंही शिरसाट म्हणाले.