शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या नाशिकचा तरुणाला पोलिसांनी केली अटक
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आणखी काही आक्षेपार्ह मजकूर निखिलच्या मोबाईलमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’ असा मजकूर लिहिलेला आहे. निखिल भामरेच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी मुंबई, महाराष्ट्र पोलिसांनी टॅग केलं आहे.
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडल विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे या युवकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कलम 153 कलम 107 कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.