शिंदखेडा तालुक्यात फिरते पशुचिकित्सक अँब्युलन्स मंजुर
शाम सनेर यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा
शिंदखेडा (यादवराव सावंत) मुख्यमंत्री पशु स्वास्थ या कार्यक्रमांतर्गत आज शिंदखेडा तालुक्याचा समावेश महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तथा पशुसंवर्धन मंत्री नामदार सुनील केदार यांनी केलेला आहे. दिनांक 14 मार्च शासनाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या महिन्यात पशुसंवर्धन मंत्री तालुका शिंदखेडा येथे दौऱ्यावर आलेले असताना माजी.जि.प. सदस्य हेमराज पाटील, प्रकाश पाटील, रावसाहेब पवार, राजेंद्र देवरे, विरेंद्र झालसे, महेंद्र पाटील, आबा मुंडे, शामकांत पाटील, नरेंद्र पाटील, प्रविण पवार, भैय्या माळी, विलास गोसावी या सर्व तालुक्यातील पदाधिकारी व पशुधन पालक शेतकऱ्यांनी मंत्री महोदय यांच्या कडे पशु वैद्यकीय पथक उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रार केली होती. त्याअनुषंगाने मंत्री महोदय यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि आज या संदर्भात शासनाने आदेश पारित करून शिंदखेडा तालुक्यातील पशुधन शेतकऱ्यांना एक सुखद धक्का दिलेला आहे. पशुधनाच्या आरोग्यासाठी हे फिरते पथक अॅबुलन्स शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकरी वर्गाला त्याचा फारच मोठा फायदा होणार आहे. या फिरत्या पशुवैद्यकीय वाहन मंजूरमुळे पशुधन पालकांना मध्ये समाधान व्यक्त करत आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष.शाम सनेर यांच्या पाठपुरावाला यश आले म्हणून तालुक्यातील शेतकरी वर्ग कडुन त्यांचे आभार मानले आहेत.



