‘भारत देश हाच संपूर्ण लोककथेचा जनक’ : प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार (सुप्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक व साहित्यिक, लातूर) यांचे ‘मराठी लोककथांमधील वैज्ञानिकता’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे तसेच एम.टी.शिंदे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘लोककथांमधील विज्ञान विद्यार्थ्यांनी तसेच समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लोकसाहित्याविषयी व लोकसाहित्य संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी हीच कार्यक्रम आयोजनामागची भूमिका आहे.’
यावेळी प्रा.डॉ. राजेश तगडपल्लेवार ‘मराठी लोककथांमधील वैज्ञानिकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी. मराठी भाषा संवर्धनासाठी वाचन,संभाषण व संवाद या गोष्टी होणे गरजेचे आहे. भाषा परिवर्तन हे जीवंतपणाचे लक्षण आहे. भारत देश हाच लोकसाहित्याचा जनक आहे. लोककथा ह्या उपदेशपर असतात त्याबरोबरच त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला असतो त्यावर संशोधकांनी प्रकाश टाकणे आवश्यक आहे.आज लोकसाहित्य नव्या स्वरूपात येऊ लागले आहे ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन. एस. कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘वेगवेगळ्या भाषेतील शब्द मराठीत येऊन मराठी समृद्ध होत आहे. मराठी भाषा आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरेल यात शंका नाही. आज भाषा संवर्धनासाठी वाचन संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन डॉ. एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाभरातून विविध महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.