कृषीपंपाच्या वीजबिलातून थकबाकी मुक्त होण्यासाठी केवळ १५ दिवस बाकी
बोरद (योगेश गोसावी) कृषीपंपाच्या वीजबिलातून थकबाकी मुक्त होण्यासाठी आता केवळ १५ दिवस राहिले आहेत. कृषी वीजबिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम पूर्ण व चालू वीजबिल येत्या ३१ मार्च पर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी रक्कमही माफ करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने ६५ टक्के वीजबिल माफीची योजना लागू केली आहे.
त्यानुसार तळोदा तालुक्यात महावितरण कंपनी कडून शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्याना ऊर्जा विभागाच्या वीजबिल माफीच्या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यानुसार तळोदा तालुक्यातील तळवे येथे वीजबिल वसुली मेळाव्यात तळवे येथील प्रगतशील शेतकरी दशरथ विठ्ठल पाटील यांनी स्वतःच्या १५ कृषिपंपांची राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने लागू केलेल्या ६५ टक्के वीजबिल माफीच्या योजनेचा लाभ घेत १२ लाख ७३ हजार एवढी रक्कम चेक स्वरूपात भरणा केली. व ते थकबाकी तून मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा महावितरण कंपनी कडून शाल व पुष्पगुच्छ देवून मेळाव्यात सत्कार करण्यात आला. या योजने संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांन कडून शेतकऱ्यांना समर्पक भाषेत पटवून देत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत. आता पर्यंत तळोदा तालुक्यात १ कोटी ६० लाख रुपयाची वसुली झाली असल्याच सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे शेतकऱ्यांचे मेळावे यशस्वी करण्यासाठी महावितरण कंपनीचे लाईनमन जनमित्र परिश्रम घेत आहेत.