श्री प्रकाशचंद जैन फार्मसी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जामनेर (ईश्वर चौधरी) श्री प्रकाशचंद जैन फार्मसी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रकाशचंदजैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया तसेच सचिव मनोजजी कावडीया तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संचालक अभय कावडीया, अशोक तालेरा उपस्थित होते. हेच या कार्यक्रमाला पत्रकार बंधूंची उपस्थिती लाभली.

या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी फॅशन शो, अंताक्षरी, चॉकलेट डे, ट्विन्स डे, ट्रॅडिशनल डे साजरे केले. त्याचबरोबर क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस या विविध स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आल्या. त्या सर्व स्पर्धेतून जे विद्यार्थी यशस्वी झाले अशा सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना भव्य असे स्टेज उपलब्ध करून देण्यात आलेले होते. या स्टेजवर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची आत्महत्या, नारी सन्मान जनजागृती, अफजल खानाचा वध, शिवाजी महाराजांचा पोवाडा, महाराष्ट्राची संस्कृती, लोकनृत्य असे विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम सादर करून जनजागृतीही केली. या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मयूर भुरट यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातून संशोधनाकडे या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव मनोज कावडीया यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा.सुनील बावस्कर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.




