जागतिक चिमणी दिवस यानिमित्ताने सहयोग सोशल ग्रुपतर्फे बर्ड फीडरचे वाटप
तळोदा (प्रतिनिधी) बाराव्या जागतिक चिमणी दिवसाच्यानिमित्ताने सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांच्यातर्फे निवासी वनविभाग तळोदा येथे पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा येथील तहसीलदार गिरीश वाखारे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मण पाटील. उपवनरक्षक निवासी वनविभाग तळोदा व अनिल रोढे वनक्षेत्र अधिकारी तळोदा तसेच सर्व वनविभागातील कर्मचारी व सहयोग सोशल ग्रुप चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांचे स्वागत शाल श्रीफळ व रोपटे देऊन करण्यात आले.
दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड व मानवी वस्तीत वाढणारी सिमेंटची घरे यामुळे पक्षांना घरटे करण्यासाठी जागा उरली नाही. तसेच त्यांची संख्या सुद्धा विविध कारणांमुळे कमी होत चाललेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्यांना पुरेसे पाणी सुद्धा मिळणे कठीण झाले. ही बाब हेरून पक्षांना योग्य निवारा मिळावा तसेच त्यांच्या अन्नाची व पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते ४०० बर्ड फिडर ,वॉटर फिटर चे वाटप सहयोग सोशल ग्रुप द्वारे करण्यात आले. मानवी वस्तीत राहणाऱ्या व जैविक चक्राचा महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या चिमण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे.
पाठ्यपुस्तकात व बाल गीतात महत्त्वाचे स्थान मिळवणारी चिमणी आता मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईलच्या टावर मधून निघणारे घातक ध्वनिलहरी मुळे चिमणी सारख्या पक्षांचा मृत्यू अधिक होतो. लहान बाळाला भरवताना आई एक घास चिऊचा एक घास बाळाचा अशा पद्धतीने भरवते. परंतु आता चिमणीसाठी आपणास घास काढून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पक्षांना अन्न ,पाणी मिळावे या उद्देशाने सहयोग सोशल ग्रुप द्वारे विविध ठिकाणी फिडर चे वाटप करण्यात येईल. तरी सर्वांनी चिमणी व इतर पक्ष्यांना वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे आपल्या पुढील पिढीस चिमणी हा पक्षी फक्त पुस्तकात नाही तर प्रत्यक्षात दिसायला हवा यासाठी पक्षी संवर्धन व फिडर चा योग्य उपयोग करण्याचे आवाहन अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन यांनी केले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून आलेले लक्ष्मण पाटील यांनी सहयोग सोशल ग्रुप द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली .जागतिक चिमणी दिवस याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. चिमणी दिवस साजरा करण्याचा उद्देश व चिमणी संवर्धन करण्यासाठी विविध उपाय कसे योजावे यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. लहान मुलांना चिमणी चे महत्व तसेच पक्षी संवर्धन विषयी अधिक माहिती सांगण्यासाठी आग्रही असले पाहिजे. लहान मुलांना पक्ष्यांच्या काळजी घेण्याविषयी अधिक माहिती दिली गेली पाहिजे जेणेकरून पुढील पिढी पक्षी संवर्धनासाठी चांगले कार्य करू शकेल. असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे असलेले तहसीलदार गिरीश वखारे साहेब यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी होळीनिमित्त वृक्षतोड न करता प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन केले. तसेच धूलिवंदन साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा केमिकल अथवा हानिकारक रंगांचा वापर करू नये यासंबंधीच्या आवाहन यांच्यातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी सहयोग सोशल ग्रुप अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन ,उपाध्यक्ष डॉ. संदीप जैन डॉ. योगेश बडगुजर कोषाध्यक्ष, डॉ.महेश मोरे सहसचिव, गुड्डु जिरे, राज चोपडा, रवींद्र चव्हाण, महेंद्र सुर्यवंशी, देवेन्द्र चव्हाण, सोहेल मन्सुरी, राकेश भोइ, प्रमोद जहागीर, निलेश वसावे, मोईन पिंजारी तसेच वनविभाग चे सर्व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ.सुनील लोखंडे यांनी केले आभार अल्पेश जैन यांनी मानले.