सोयगाव तालुक्यातील वाडी वस्त्यांना भेटी देत अब्दुल सत्तार यांनी धुलीवंदन सण केला साजरी
सोयगाव (प्रतिनिधी) महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सोयगाव तालुक्यातील वाडी वस्त्यांना भेटी देत धुलीवंदन सण साजरा केला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बांजारा समाजाच्या पारंपारिक उत्साहात सहभागी होवून येथील नागरिकांना होळी व धुलीवंदन सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर आहेत. होळी धुलिवंदनाचा सण बंजारा समाजात फार उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. जवळपास सप्ताहभर हा सण तालुक्यात साजरा होतांना दिसतो. कोविड-19 साथ रोगाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षानंतर तालुक्यात रंगपंचमी उत्साहात साजरी होताना दिसली.
दरवर्षी राज्यमंत्री अब्दुल सत्तार येथील वाडी वस्त्यांवर होळी साजरी करतात. तालुक्यात होळीच्या निमित्ताने पुरुष महिलांना रंग लावतात तर महिला पुरुषांना काठीने मारतात. या प्रथेला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देखील सामोरे जावे लागले. यावेळी पारंपारिक गीते सादर करून महिलांनी अतिशय गमती जमती करीत अब्दुल सत्तार यांना काठी मारली. यावेळी उपस्थित सर्वच जण हश्यात न्हावून निघाले.



