कपडा मार्केट आग प्रकरणी 54 दुकानांचे 3 कोटी 57 लाख 95 हजाराचे नुकसान !
धुळे (विक्की आहिरे) शहरातील पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या शंकर मार्केटला मंगळवारी आग लागली होती. आगीत मार्केटमधील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार अप्पर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ४ तहसीलदारांकडून नुकसानीचे पंचनामे बुधवारी रोजी करण्यात आले. त्यात मार्केटमधील ५४ दुकानांचे ३ कोटी ५७ लाख ९५ हजारांचे नुकसान झाले आहे.
यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारात शंकर मार्केटमधील एका दुकानाला आग लागून ती सर्वत्र पसरली. मार्केटमधील दुकाने आणि त्यातील साहित्य जळून नुकसान झाले. या घटनास्थळी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, अपर तहसीलदार संजय शिंदे यांनी भेट दिली होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे तहसिलदारांना दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळपासून एक मंडळाधिकारी व तीन तलाठी अशा चार जणांच्या पथकांकडून घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दिवसभरात संपूर्ण मार्केटमधील नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे केले गेले. त्यानुसार आगीत एकूण ५४ दुकानांचे ३ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अपर तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे मंडळाधिकारी पंडित जावळे, धुळे तलाठी कमलेश बाविस्कर, देवपूर तलाठी पाडेन, मोहाडी, अवधान तलाठी अमृत राजपूत व महिंदळे तलाठी शिरसाठ यांनी हे पंचनामे केले.