धुळे येथे लक्ष्मीनगरात चोरट्यांनी फोडले कपाट ; हमालाच्या घरात ३ लाखांचा डल्ला
धुळे (स्वप्नील मराठे) धुळे भागवत कथा कार्यक्रमासाठी गेल्याने, घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने घर फोडले. रोख रकमेसह दागिने असा ३ लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बाजार समितीच्या मागील बाजूस लक्ष्मीनगरात सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
बाजार समितीच्या मागील बाजूस अभय कॉलेजजवळ लक्ष्मीनगरात राहणारे गोकुळ पोपट खेमणार यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, हमाली करणारे गोकुळ खेमणार यांचे दोन मजली घर आहे. मागील बाजूचे दोन भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. पुढील एका रूममध्ये त्यांची सूनबाई साडीचे आणि शिलाई कामाचे दुकान चालविते. २८ रोजी रात्री ११ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास गोकूळ खेमणार यांच्या पत्नी हमाल मापाडी येथे भागवत कथा कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. घरातील सर्वजण वरच्या मजल्यावर झोपलेले होते. चोरट्याने ही संधी साधून खालच्या घराचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. भागवत कथा आटोपल्यानंतर घरी परतल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.