महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या निवडणुकीत नानाभाऊ नागमोते विजयी
सर्वोच्च न्यायालयाची याचिका निकाली : भातकुलीला मिळाले राज्यावर प्रतिनिधित्व
भातकुली (महेंद्रसिंग पवार) महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रातील बाजार समित्यांचा महासंघ म्हणुन ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ,पुणे यांच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नानाभाऊ नागमोते विजयी झाले. त्यांच्या विजयाने भातकुली शहरवासीयांना राज्यावर प्रतिनिधित्व मिळाले. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ,पुणेची २१ संचालक पदाची निवडणूक १८ मार्च २०१८ रोजी झाली होती व २१ मार्च २०१८ रोजी मतमोजणी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने याचिकेवरील निर्णय होईपर्यत मतमोजणी रखडली होती. दरम्यान, तब्बल चार वर्षानंतर दि.१५ मार्च २०२२ रोजी याचिका निकाली काढण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांचा महासंघ म्हणुन ओळख असलेल्या सहकार क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांची पंचवार्षीक निवडणुकीत अमरावती-वाशिम मतदारसंघातून अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. ज्ञानेश्वर ऊर्फ नानाभाऊ नागमोते मोठया मताधिक्याने निवडुन आले.
स्व. संजय बंड यांची कमी जाणवली
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ,पुणे यांच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व लोकनेते, माजी आमदार स्व. संजय बंड यांचे कट्टर समर्थक, सहकारी नानाभाऊ नागमोते विजयी झाले. त्यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असतांना अनेक शिवसैनिकांना लोकनेते माजी आमदार स्व.संजय बंड यांची कमी जाणवत असल्याचे बोलून दाखवले. यावेळी सर्व भावुक झाले होते.