आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी
वाहतूक कोंडीतील अडथळे तात्पुरत्या स्वरूपात होणार कमी
डोंबिवली (प्रतिनिधी) जुना मुंबई पुणे महामार्गावरील नैसर्गिक नाले पुनर्जीवित केल्या नंतर आता कल्याण शीळ रोड वरील नाले देखील पुनर्जीवित होणार आहेत. यासाठी स्वतः आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी आणि केडीएमसी अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात कल्याण शीळ रोड वर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालकांना होणारा मनस्ताप कमी होणार आहे.
कल्याण शिळ रस्त्याच्या डीपीआर मध्ये नैसर्गिक नाल्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या मध्ये हे नैसर्गिक नाले नसल्याने रस्त्यावर पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता. यानंतर एमएसआरडीसी ने नवीन नाल्यांची निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव हा शासनाकडे पाठवला आहे. बंद झालेले नैसर्गिक नाले पुनर्जीवित केल्यास नाल्यांमधील रस्त्यावर येणार पाणी थांबून त्याचे नैसर्गिक नाल्यांमधूनच निचरा होणार आहे. तर अनेक नाल्यांवर झालेले अतिक्रमण पाठपुरावा ते तोडून नाले पुनर्जीवित करण्याचे लक्ष हे आमदार राजू पाटील यांनी ठेवले आहे. यासाठी आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अभियंता नागपाल, उप अभियंता बोरडे, केडीएमसीचे इ वॉर्ड अधिकारी राजेश वसईकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्यासह पाहणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कल्याण शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी तसेच वाहतूक कोंडी आणि नैसर्गिक नाले यांची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील , मनसेचे डोंबिवली शहर संघटक तकदीर काळन, योगेश पाटील, संतोष पाटील यांसह अन्य पदाधीकारी देखील उपस्थित होते.
धुळीच्या रस्त्यावर तात्पुरता डांबराचा मारा
कल्याण शीळ रोड वरील पलावा जंक्शन परिसरात रस्त्याचे काम हे सुरु आहे.त्यामुळे रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात ताबडतोप डांबरीकरण करण्याची सूचना आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी ?
कल्याण शिळ रोड वरील पलावा चौक हा नायनाट महत्वाचा आहे. या चौकात निळजे हेवन, काटई,कासा रिओ पलावा सिटी आणि शिळफाटा येथून वाहनांची वाहतूक याच चौकातून होत असते. मात्र चौकातील अनधिकृत बांधकामे हि वाहतूक कोंडी सह अपघातांना निमंत्रण देखील देत आहेत. तर पलावा जंक्शन परिसरात पलावा पुलाचे काम सुरु आहे. परंतु आडकाठी येणारी धोकादायक अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महानगरपालिका चालढकल करत आहे.सदर अनधिकृत बांधकामे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून वाहतूक कोंडी मध्ये भर पडत आहे. या बांधकामांवर महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील वाहनचालक करत आहेत.