केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची रस्ते विकासासंदर्भात दिल्ली येथे चर्चा
मंगरूळ ते भवन तसेच सिल्लोड ते पिंप्री पर्यंत रस्त्याचे ही होणार सुशोभीकरण
सिल्लोड (विवेक महाजन) औरंगाबाद – जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणीची सोडवणूक करण्यासंदर्भात आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान सिल्लोड शहर, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघ व जिल्ह्यातील केंद्र सरकार अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासह नवीन रस्ते , रस्त्यात सुशोभीकरण व विद्युत रोषणाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे देखील उपस्थित होते.
या भेटीदरम्यान हर्सूल येथे वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे, अजिंठा घाटाचे चौपदरीकरण करणे, फर्दापूर व अजिंठा गाव पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने या रस्त्यावर सुशोभिकरण करणे, तसेच सिल्लोड शहरातील सर्वच चौकांचे सुशोभीकरण करणे, सिल्लोड शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जंक्शनवर अंडरपास करणे, मंगरूळ ते भवन नगर परिषद हद्दीपर्यंत इलेक्ट्रिक पोल तसेच दुभाजकांमध्ये झाडे लावून सुशोभिकरण करणे, सर्विस रोडची तरतूद करणे, सिल्लोड शहरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करणे , सिल्लोड नगर परिषदेच्या पाण्याची पाईप लाईन स्थलांतर करण्यासाठी अंदाजपत्रकास मान्यता देण्यात यावी, भोकरदन कडून सिल्लोड शहरात येणारा पिंप्री ते सिल्लोड रस्त्याचे सुशोभीकरण व विद्युतीकरण करणे , आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या सर्व विकासकामांना सहमती दर्शवीत तत्वतः मान्यता दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान हर्सूलच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हर्सूल येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण करणे आवश्यक आहे. नसता येथे उड्डाणपूल बांधल्या शिवाय पर्याय नाही. हर्सूल येथील पुरातन नहेरे अंबरी व कब्रस्तान चा विचार करता गावातील नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास साथ द्यावी. तसेच येथील उड्डाणपूल जर टाळायचा असेल तर हर्सूल येथे रस्ता चौपदरीकरण कामासाठी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी हर्सूल गावच्या गावकऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी चौपदरीकरण कामासाठी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याची सहमती दर्शविली होती. हर्सूल येथे रस्ता कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे नागरिकांनी येथील अतिक्रमण काढायला सहकार्य केले तर हर्सूल येथे उड्डाणपूल होणार नाही असे अब्दुल सत्तार म्हणाले.
मतदार संघातील रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी
सोयगाव तालुका हा अतिदुर्गम व डोंगरी भागांत येत असून सिल्लोड व सोयगाव तालुक्याला जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्रमुख रस्त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.