बोरद परिसरात तापमानात वाढ ; उसाच्या रसाला नागरिकांची पसंती
बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील बोरदसह परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून तापमानात वाढ झाली असून तापमान हे ३९ ते ४१ सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे दुपारी बारा नंतर रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक आपली काम सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ण करत असून दुपारच्या वेळेला घरीच राहण पसंत करीत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात तापमानाची नोंद ही ४१ ते ४२ सेल्सिअस केली जात होती. मात्र यंदा मार्च महिन्यातच तापमान हे ३९ ते ४१ पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
अतिमहत्वाच्या कामानिमित्त नागरिकांना दुपारी घराच्या बाहेर पडताना टोपी, रुमाल बांधून बाहेर पडावे लागत आहे. तसेच शेतकरीही सकाळीच आपली काम आटोपून उर्वरित कामे दुपारी चार नंतर करत आहे. त्यातच दुपारच्या वेळी उन्हाने लाहीलाही होत असल्याने नागरिक उसाच्या रसाला पसंती देत असून त्यामुळे गावोगावी फिरणाऱ्या उसाच्या गाड्यांवर गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे फिरती रसंवती चालवणाऱ्याना रोजगार उपलब्ध झाला आहे, ते गावोगावी फिरून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. तसेच मार्च महिन्यातच तापमान वाढले असल्याने मार्च हिट जाणवत आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या एप्रिल, व मे महिन्यात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.