नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे विधायक उपक्रम
मंगळ बाधा व दोष निर्मुलनासाठी अमळनेर येथे विनामूल्य अभिषेक
नंदुरबार : सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी शक्य न होणाऱ्या सामाजिक कार्याचा विडा नंदुरबार येथील सतीश प्रभाकर वानखेडे यांनी उचलला आहे. या नामीसंधीचा फायदा सुवर्णकार समाजबांधवांनी अवश्य घेण्याचे आवाहन नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आले आहे.
घर परिवार तसेच कुटुंबात किंवा आपल्या नाते संबंधात कोणी मंगळ बाधित मुलगा व मुलगी असेल त्यांची मंगळ ग्रहशांती व अभिषेक, जग प्रसिद्ध अशा अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील मंगळ ग्रह महाराज मंदिरात सामुहिकरित्या विनामुल्य करून घेण्याचे प्रयत्न असून याबाबत नियोजन सुरू आहे. यानिमित्ताने जी मंगळ बाधित मुले – मुली, थोडे दुर्लक्षित व उपेक्षित राहून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे पालकही चिंताग्रस्त आहेत. अशा सर्वांना एकाच ठिकाणी आणुन त्यांची मंगळशांती पुजा व आपसात ओळख परिचय घडवुन आणावा असा नम्र उद्देश नंदुरबार सोनार समाज कार्यकारिणी साकारत आहेत.
कार्यक्रमाच्या दिवशी चहा, नाश्ता व दुपारच्या जेवणाची व्यवस्था विनामुल्यच ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासह परजिल्ह्यातील लांबच्या ठिकाणाहून येणार्या भाविकासाठी रात्रीचा मुक्काम व भोजनाची व्यवस्था देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एक लिंक असून त्या मार्फत मंगळ बाधित मुलांनी स्वतःचा फॉर्म भरून संयोजकाकडे पाठवायचा आहे. पूजेची ता. 25 एप्रिल 2022 सोमवार वेळ सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – सतीश प्रभाकर वानखेडे (8329075195, / 7620425913) राजेंद्र अभिमनुशेठ जाधव (9823774535) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संवाद साधण्याचे आवाहन नंदुरबार अहिर सुवर्णकार समाज यांच्यातर्फे करण्यात आले आहे.