नळवे बु. येथे महिला महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
नंदुरबार (प्रतिनिधी) तालुक्यातील नळवे बु. येथे महिला महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दैनंदिन जीवनात ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन करून प्रबोधन करण्यात आले.
ट्रायबल एज्युकेशन सोसायटी संचलित महिला महाविद्यालयातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत नळवे बुद्रुक येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या सत्रात अन्न सुरक्षा या विषयावर महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, कुठलेही खाद्यपदार्थाची पॅकिंग व नष्ट होण्याची तारीख तपासून घेणे गरजेचे आहे. यातूनआरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतचे निमंत्रीत सदस्य योगेश्वर जळगावकर यांनी ग्राहक कायद्या विषयी विवेचन केले. ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांनी सुरू केलेली ग्राहक चळवळ भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरले असल्याचे मत जळगावकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. साळुंखे, प्रा.जैहेदी, प्रा. हजारी उपस्थित होते.