हप्ते वेळेवर खात्यात येत नसल्याने घरकुल लाभार्थी परेशान
बोरद (योगेश गोसावी) गरीब व बेघरसाठी शासनाने पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना सुरू केली. मात्र, वेळेवर पैसे मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्णावस्थेत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
केंद्र शासनाने पंतप्रधान घरकुल योजना व राज्य शासनाने शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना सुरू केलेल्या आहेत. घरकुल बांधण्यासाठी एक लाख ५० हजार रुपये पर्यंत निधी देण्यात येतो. निधी ऑनलाईन असल्याने टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा होत असतात. घरकुल पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे लागत असतात अनेक लाभार्थ्यांचे हप्ते पडले नसल्याने घरकुल अर्धवट अवस्थेत आहे. महागाईमुळे १,५०,००० घरकुल पूर्ण होत नाही. विटा, सिमेंट, रेती, मजुरी लोखंडाचे दर गगनाला भिडल्याने महागाईत वाढ झाल्याने त्याला दीड लाखात घर बांधणे जिकिरीचे झाले आहे. वेळेवर हप्ते पडत नसल्याने लाभार्थी तळोदा येथे दररोज रोजंदारी बुडवून पंचायत समितीमध्ये चकरा मारत असतो तिथे गेल्यावर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात आठ महिन्यापासून ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
एसटी बस बंद असल्याने रोज खाजगी वाहनाने जाणे लाभार्थ्याला परवडत नाही. अनेक लाभार्थ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी निधीअभावी घर अपूर्णावस्थेत आहे. तरी शासनाने त्वरित अपूर्ण राहिलेले हप्ते लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावे व मागणी वाढल्याने घरकुलच्या निधीमध्ये ही वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.