साकलीउमर ते वेली रस्त्याचे खडीकरण झालेल्या कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
कोठार (राहुल शिवदे) अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली या रस्त्याचे काम सुमारे 2 वर्षा पासुन सुरु आहे.अधुन मधुन होणाऱ्या या रस्त्याच्या खडीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.याबाबत निवासी उप जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन ग्रामस्थांनी निवेदन दिले.
वेली आणि बेडाकुंड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वेली, बेडाकुंड, वाडीबार आदी गावातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी किंवा मोलगी येथे येण्या – जाण्यासाठी साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली असा रस्ता आहे सदर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वेली, बेडाकुंड परिसरातील नागरिकांनी नव्याने रस्ता बनविण्याची मागणी केली होती. त्यानुसार सन 2019/ 20 या आर्थिक वर्षात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली हा रस्ता मंजूर करण्यात आला व प्रत्यक्षात त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली,मात्र सदर रस्त्याच्या कामाला सुमारे दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असतांना देखील आतापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे माती काम न करता सरळ सरळ अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणावर अत्यंत निकृष्ट दर्जाची खडी टाकण्यात आली व त्यावर रोलरने दबाईचे काम देखील केले गेले नाही, परिणामी रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी ही बाहेर निघून ठिक ठिकाणी तिचे ढिग तयार झाले आहेत. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्री बेरात्री येणाऱ्या मोटरसायकल स्वारांना छोट्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी ठिक ठिकाणी पाईप मोऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र रस्त्यावरील काही मोरींमध्ये कोणत्याही प्रकारचे पाईप टाकण्यात आले नाहीत. केवळ थातूरमातूर पणे रस्त्याच्या बाजूला नाममात्र देखाव्यासाठी एक फुटाच्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत. परिणामी अशा बांधकामामुळे मोरींचा उद्देश पूर्ण झालेला नाही काही ठिकाणी पावसात मोर्यां वाहून गेल्या आहेत. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे काही ठिकाणी रस्त्याचे नवीन काम देखील वाहून गेले आहे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत तरी देखील त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या बाबतीत शासन व प्रशासन स्तरावरुन योग्य कार्यवाही न झाल्यास वेली, बेडाकुंड परिसरातील शेकडो नागरिकांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेवटी निवेदनात दिला आहे. निवेदनावर वेलीचे सरपंच गुमानसिंग तडवी, दिनेश मोग्या तडवी, अशोक बोंडा वळवी, रामसिंग जात्र्या पाडवी, विजय पाडवी, धर्मा बोंडा पाडवी, नरपत सोन्या पाडवी, गुलाबसिंग रतनसिंग वळवी, कालुसिंग वळवी आदींच्या सह्या आहेत.