जि.प. सुसरी शाळेचा १५० वा महोत्सव
भुसावळ : जि. प . मराठी मुलांची शाळा सुसरी ता. भुसावळ शाळेचा १५० वा महोत्सव साजरा करण्यात आला . कार्यक्रम अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक सरपंच ऊर्मिलाताई पाटील होत्या .शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान व केंद्रप्रमुख गजानन नारखेडे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते.
१ एप्रिल १८७२ रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात जि.प. मराठी मुलांची शाळा सुसरी शाळेची स्थापना करण्यात आली . त्यावेळेस गावात शाळा व्हावी व गावाचा शैक्षणिक विकास व्हावा, गोरगरिब व शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै. दयाराम तुकाराम पाटील यांनी त्यांच्या मालकीचे ५६ आर( १ एकर ,३८गूंठे) क्षेत्रफळ असलेले शेत शाळेसाठी दिले . त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे कै .दयाराम पाटील यांना ग्रामपंचायत सुसरीचे प्रथम सरपंच होण्याचा बहूमान मिळाला होता.
स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या या शाळेतून शिकलेल्या विदयार्थ्यांना देशप्रेमाची व राष्ट्रीय मूल्यांची शिकवण मिळाली. अनेक माजी विदयार्थी सैनिक, पोलिस व फौजदार या पदावर कार्यरत झाले. त्यामुळे सैनिकांचे गाव, फौजदारांचे गाव म्हणून गावास जिल्हयात नावलौकीक मिळाला. आजही देशरक्षणासाठी गावातील अनेक तरुण सिमेवर कार्यरत आहे. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, माध्य. शिक्षक, प्राथ. शिक्षक, शिक्षण क्षेत्र, बांधकामक्षेत्र, आर्थिक, सामाजिक, प्रचार प्रसार क्षेत्र, उद्योजक व व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रात आजही शाळेचे माजी विदयार्थी यशाची उंच उंच शिखरे गाठत आहे. अशा प्रत्येक विदयार्थ्यांचा निश्चितच शाळेस अभिमान आहे. असे मनोगत शाळेचे माजी विद्यार्थी विनोद पाटील व शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.
एकेकाळी इयत्ता पहिली ते सातवीपर्यत ३०० ते ४०० पटसंख्या असणाऱ्या व दुबार भरणाऱ्या या शाळेचा नावलौकीक होता. मात्र कालांतराने इंग्रजी माध्यमाच्या शाळा आकर्षण, भौतिक सुविधांचा अभाव व इतर कारणामुळे शाळेची पटसंख्या कमी झाली. मात्र येथील शिक्षक हरला नाही. गावकऱ्यांचे सहकार्य व उत्तम शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न कायम सुरू आहे. लवकरच सेमी इंग्रजी अभ्यासक्रम शाळेत उपलब्ध असणार आहे यासाठी गावकरी व पालक यांनी शाळेस सहकार्य करावे असे आवाहन वरणगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी केले.
शाळेचे पुजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ .निकीता क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रास्ताविक मुख्या. दिपाली भंगाळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यानंतर महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजयी विदयार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच ऊर्मिला पाटील, उपसरपंच रविंद्र पाटील, शि .वि.अधिकारी तुषार प्रधान, केंद्रप्रमुख गजानन नारखेडे, ग्रामसेवक प्रदीप वंजारी, शा.व्य. समिती अध्यक्ष नयना पाटील, ग्रामपंचायत सदस्य पूनम पाटील, सुसरी उपकेंद्र येथील डॉ .निकीता क्षिरसागर, डॉ . कोमल नेरकर ,अंगणवाडी सेविका वत्सला पाटील, कमल फालक, शकूंतला पाटील, आशा मोरे, नर्मदा पाटील तसेच माजी विद्यार्थी विनोद पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश सपकार तसेच शाळेचे विदयार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका मीरा पाटील- जंगले यांनी केले.