नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच ; अंबड परिसरात प्रोडक्शन मॅनेजरची हत्या
नाशिक : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना आणि हत्यासत्र काही थांबताना दिसत नाहीये. गेल्या 18 दिवसांत नाशिकमध्ये 8 हत्या (8 murder in 18 days) झाल्या आहेत. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड परिसरात एकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. नंदकुमार आहेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मागील अठरा दिवसांत आठवी हत्या असून यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकची गलबजलेली अंबड औद्योगिक वसाहत नेहमीच चर्चेत असते. येथील आहेर इंजिनियरिंग कंपनीच्या गेटजवळ या कंपनी कर्मचाऱ्यावर अज्ञात तीन ते चार गुंडांनी धारदार शस्त्रांनी वार करत पळ काढला. या हल्ल्यात आहेर हे गंभीर जखमी झाले. मात्र हल्ला गंभीर असल्याने रक्तस्राव अधिक होत होता. यामुळे पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आहेर हे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र या घटनेने नाशिकची गुन्हेगारी किती फोफावत चालली आहे, हे यावरून दिसून येते.
अठरा दिवसांत आठ हत्या
नाशिक शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करूनही काहीच बदल झाला नसल्याचे या घटनेवरून लक्षात येते. मागील 18 दिवसात 08 हत्या झाल्याने नाशिक हादरल आहे. तर गेल्या 02 दिवसात 03 जणांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.