राजेंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ करीत असलेले कामकाज राज्यासाठी आदर्श ठरावे : अब्दुल सत्तार
सोयगाव (विवेक महाजन) शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून सोयगाव खरेदी विक्री संघ प्रगतीचे शिखर गाठत असून सभापती राजेंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ करीत असलेले कामकाज राज्यासाठी आदर्श ठरावे असे असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे केले.
सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन विस्तारित इमारतीचे लोकार्पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज शनिवार (दि.2) रोजी संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाढे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे , नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे , जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, सतीश ताठे, नपतील गटनेते अक्षय काळे, नगरसेविका संध्याताई मापारी, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, सहाय्यक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्यासह खरेदी विक्री संघाचे उपसभापती फकिरा तडवी, संचालक शिवाप्पा चोपडे, नरसिह सोळंके, राजेंद्र भदाणे, शांताराम देसाई, रवींद्र पाटील, नितीन बोरसे, उस्मान खा पठाण, जगन्नाथ गव्हांडे, मथुराबाई जैस्वाल, श्रीराम चौधरी, दिलीप देशमुख आदींची उपस्थिती होती.
सोयगाव येथील तालुका खरेदी विक्री संघाची अत्यंत सुसज्ज व सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी नूतन विस्तारित ईमारतमुळे शेतकरी व ग्राहकांची कामे तत्परतेने होतील असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. येथील सर्व पक्षीय संचालक मंडळाचे काम कौतुकास्पद असून पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थे प्रमाणे सोयगावची संस्था प्रगती साधत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफी नंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला असून येत्या जून महिन्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभापती राजेंद्र राठोड यांनी प्रस्तावित भाषणात खरेदी विक्री संघाचा आढावा दिला. संघाला या वर्षात 18 लाख रुपयांचे उत्पन्न झाले असून संघाच्या वतीने पेट्रोल पंप साठी प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले. संस्थेचे हित व शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी सर्व संचालक मंडळ काम करीत असल्याचे राजेंद्र राठोड म्हणाले.