उमरखेड विधानसभेत खासदारच भारी ; करोडो रुपयांचा विकास निधीने जनतेची मने जिंकली
ढाणकी (निलेश जाधव) उमरखेड विधानसभा व हिंगोली लोकसभा मतदार संघात खासदार एका पक्षाचे तर आमदार दुसऱ्या पक्षाचे असा पूर्व इतिहास आहे. सध्या उमरखेड विधानसभेचे विद्यमान आमदार नामदेव ससाने तर हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील आहेत. ससाणे हे भाजपाचे आमदार तर हेमंत पाटील हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण पाहता दोन्ही लोकप्रतिनिधींची एकमेकावर कुरघोडी करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यात भर म्हणजे आता विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी करोडो रुपयाचा निधी उमरखेड महागाव विधानसभेसाठी खेचून आणल्याने उमरखेड विधानसभेत खासदारांची सर्वत्र वाहवा होत असताना आणि उमरखेड कचरा घोटाळा मध्ये आमदाराचे नाव आल्याने आमदार पेक्षा खासदारच भारी अशी चर्चा आता उमरखेड मतदार संघात रंगत आहे.
उमरखेड मतदारसंघांमध्ये सध्या आमदारांचा जन संपर्क सुद्धा कमी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे मतदार संघाचा विकास खुंटल्याची ची प्रतिक्रिया सुद्धा नागरिक देत आहेत. आमदार ससाणे यांच्या आधी भाजपाचेच राजेंद्र नजरधने आमदार होते. नजरधने यांच्यानंतर मतदार राजांनी भाजपावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा भाजपाचे उमेदवार नामदेव ससाने यांना प्रचंड मतांनी निवडून दिले. एक सच्चा कार्यकर्ता आणि लोकांची दुःख जाणारा असा सामान्य परिवारातील माणूस म्हणून जनतेनी ससाने यांच्या गळ्यात विजयश्री घातली. त्याचप्रमाणे त्यांना उमरखेड नगर परिषदेचे अध्यक्ष बनवून जनतेची सेवा करण्याची अजून एक संधी दिली. मात्र 65 लाख रुपयाच्या कचरा घोटाळ्यांमध्ये नामदेव ससाने यांचे नाव आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून गरीबाचा माणूस आता गरीब राहिला नाही अशी चर्चा आता मतदारसंघात चांगलीच रंगत आहे. या सर्व बाबीचा पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत परिणाम दिसतीलच असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
एकंदरीत या सर्व राजकीय घडामोडी नंतर दुग्धशर्करा योग म्हणजे खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेवटचे टोक असलेल्या उमरखेड व महागाव मतदार संघासाठी करोडो रुपयाचा रस्ते विकासासाठी निधी खेचून आणल्याने शिवसेनेचे वादळ मतदार संघात उठले आहे. यामुळे याचा निश्चितच होणाऱ्या पुढील निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल असे सुद्धा जनतेची म्हणणे आहे. खासदार हेमंत पाटील यांचा उमरखेड व महागाव विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क सुद्धा आता वाढलेला असून यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याची सुद्धा राजकीय विश्लेषक गणित जुळवत आहे.