भडगावात पाडवा पहाट रंगली ; अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
भडगाव (सतीश पाटील) स्नेह सेवा प्रतिष्ठान भडगाव आयोजित भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना समर्पित असलेले नादब्रम्ह पाचोरा या संस्थेने प्रस्तुत केलेले सूर जिथे रंगतो ही पाडवा पहाट रसिक श्रोत्यांना तृप्त करून गेली. गेल्या दोन वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांपासून दुरावलेल्या रसिक श्रोत्यांसाठी मराठी नववर्षाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या या संगीत मैफिलीची सुरुवात ज्ञानेश्वरांच्या ओम नमो जीआद्या या गीतानं झाली.
गगन सदन, ओम नमो हा सुर जिथे, ने मजसी ने सागरा प्राण तळमळला, म्यानातून उसळे तलवारीची पातं , उठी उठी गोपाळा, अभिर गुलाल उधळीत रंग यासारख्या समूह गीतांनी रसिक तृप्त झाले तर गोविंद मोकाशी यांनी सादर केलेल्या घनश्याम सुंदरा, ऊठी ऊठी गोपाळा,माझे माहेर पंढरी यासारख्या भक्ती गीतांनी रसिक तृप्त झाले. या मैफिलीत ऐश्वर्या परदेशी हिने सादर केलेले भेटी लागी जीवा, देवांगिनी मोकाशी हिने सादर केलेले विजय पताका, भावनांचा तू भुकेला रे मुरारी पुनम पाटील हिने सादर केलेले प्रभाती सुर नभी आणि रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा तसेच समृद्धी जोशी हिने गायलेले रचिल्या ऋषी मुनींनी तसेच घनराणी या गीताने रसिकांचे मनं जिंकले तर चैताली पाटील हिने सादर केलेले अधीर मन झाले आणि प्रशांत सोळंखे याने सादर केलेले अभिर गुलाल वृषाली दुसाने आणि स्वाती महाजन यांनी सादर केलेले पिया तोसे नैना लागे रे, डाॅ. दुर्गेश रुले यांनी निघालो घेउनी दत्ताची पालखी अशा विविध गाण्यातून रसिक श्रोते तृप्त झाले.
यावेळी महेश कौंडिण्य यांच्या अप्रतिम निवेदनाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली तर सिंथेसायझर वर गौरव काळंगे, ऑक्टो पॅडवर कैलास निकम, मंजिरीवर सोपान पाटील, हार्मोनियम वर प्रथमेश मोरे यांचे सह अमेय भट, चिन्मय कुलकर्णी, भाग्यश्री मोरे यांच्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. पाडवा पहाट हा कार्यक्रम दि. २ रोजी गुढी पाडवा सणाला सकाळी ५.३० वाजता पार पडला. भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या आवारात पार पडला. सुरुवातीस प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन लखीचंद पाटील(स्व.बापूजी युवा फाउंडेशन), डॉ.निलेश पाटील (जिल्हा संघचालक), स्वप्नील पाटील (व्यवस्थापक, जळगाव जनता बँक), सुयोग जैन(मास्टरलाईन फाउंडेशन). आदि मान्यवरांनी केले. डॉ. पुनम प्रशांत पाटील, जयश्री गणेश पूर्णपात्री, सुनीता विजय जैन, दायमा , ज्योती दिनेश तांदळे, डॉ.शिल्पा प्रमोद पाटील, पुष्पलता शिरीषकुमार भोसले आदि महिलांनी गुढी पुजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दुर्गेश रुले व प्रतिभा कुलकर्णी, वैशाली पाटील आदिंनी केले.यावेळी विनय जकातदार, नथ्थु अहिरे, सुरेश भंडारी, प्रा. दिनेश तांदळे, पञकार अशोक परदेशी, वाडे माजी महिला उपसरपंच ऊषाबाई परदेशी, प्रा. सुरेश कोळी , प्रशांत सोळंके यांचेसह नागरीक, महिलांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विजय देशपांडे, भुषण थेपडे, उदय देशमुख, रवी कुलकर्णी, डॉ.ईश्वर परदेशी , अश्विनी सोमवंशी, प्रतीक पाटील आदिंनी केले होते.