बाबासाहेब आ.कुणाल पाटील यांची राजकारणातील दरियादिली
धुळे (चुडामण पाटील) खरं तर राजकारण म्हटले की एकमेकांचा काट्याने काटा काढणे आणि खुर्चीसाठी, सत्तेसाठी भांडून आपले आणि विरोधकांचे एकमेकांचे पाय खेचण्याचे काम केले जाते, त्यामुळेच की काय एका अर्थाने राजकारण बदनाम झालेले आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील राजकारणाला सन्मानाचे आणि उदारतेच्या एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम काँग्रेसचे नेते बाबासाहेब आ.कुणाल पाटील यांनी केले आहे.

निवडणुका संपल्यावर राजकारण विसरून प्रत्येक पक्षाच्या नेत्याला सन्मान देत आ.कुणाल पाटील यांनी आपल्या उदार स्वभावाने विरोधकांना आपलेसे करण्याचे काम केले आहे. त्यामुळेच की काय त्यांच्या स्वभावाचा विरोधकांनाही हेवा वाटावा आणि राजकारण विसरून कुणाल बाबांचा हात धरावा असा किंचितसा विचार विरोधकांच्या मनात घर करून जातो. धुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण हरलं? कोण करत पराभूत झालं? या चर्चेपेक्षा आ. कुणाल बाबा यांच्या आपल्या मुरब्बी आणि उदार,दिलदार स्वभावामुळे निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लोकसभा आणि विधानसभेतील कट्टर विरोधकांसोबत परिपक्व नेतृत्वाची झलक दाखवत बँकेची निवडणूक लढवली. याचीच सर्वाधिक चर्चा जनतेमध्ये रंगली झाली. जे ठरले ते करायचे आणि दिलेला शब्द इमानेइतबारे पाळायचा हा तर आ. कुणाल बाबा पाटील यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसाच आहे. आणि त्या वारसाला अणू-रेणू एवढाही धक्का न लावता माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांना चेअरमन केले. पिढ्यानपिढ्या विरोध करणाऱ्या कट्टर विरोधकांचे सन्मानाने नाव घेत व्यासपीठावर मानाची खुर्ची देण्याचा उदारपणा आ.कुणाल बाबांनी दाखवला आणि आपल्या सकारात्मक भूमिकेतून मातब्बर राजकारण्यांच्या मनावर आदराचे स्थान मिळवित अधिराज्य गाजविण्याचा मानही मिळविला.
झालं गेलं गंगेला मिळालं, पक्षीय आणि सुडाचे राजकारण न करता प्रेमाची व मैत्रीच्या भाषेतून राजकारणतील वैर विसरून विरोधकांचेही मन जिंकण्याची उदारता आ. बाबासाहेब कुणाल पाटील यांच्यामध्ये आहे. काही राजकारणी निवडणुकांची भाषणे फक्त मते मिळवण्यासाठी करीत असतात, मात्र कोणतीही निवडणूक नसतांना साक्षात ईश्वराच्या (रोकडे हनुमान) दरबारात केलेली भाषणे आणि झालेली चर्चा ही त्रिकालाबाधित सत्य असते. म्हणूनच धुळे ग्रामीणमध्ये झालेल्या एका सत्कार समारंभात इतर पक्षातील सन्मित्रांनीही आ.कुणाल बाबांचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे कबूल करावं यापेक्षा दुसरं सत्य असूच शकत नाही. भाषण कोण करते हे महत्त्वाचे नसून बेंबीच्या देठापासून तळमळीने ती व्यक्ती बोलते हे अतिशय महत्त्वाचे असते. असो या निमित्ताने बाबासाहेब आ. कुणाल पाटील यांची दरियादिली पब्लिकच्यासमोर राजकारणातील सन्मित्रांनी खुल्या दिलाने कबूल केली आणि जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून दिली हेही नसे थोडके !




