पोहताना लागला दम अन् १६ वर्षीय मुलाचा गेला जीव
पुणे (वृत्तसंस्था) कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या एका जलतरण तलावात सोळा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घडली. पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला. सोमेश राठोड (वय १६, रा. सच्चसाईमाता मंदिराजवळ, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
जांभुळवाडी भागात अर्जुुन जलतरण तलाव आहे. राठोड सोमवारी दुपारी जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला. जलतरण तलावात पाेहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली. राठोड याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
जलतरण तलावाच्या परिसरात जीवरक्षक नेमण्यात आले नव्हते. याबाबतची तक्रार रहिवाशांनी महापालिकेकडे काही दिवसांपूर्वी केली होती. जलतरण तलाव व्यवस्थापनाच्या बेजबाबदारीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.