सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील 32 ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास मंजुरी
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने मंजुरी दिल्याची राज्यमंत्री सत्तार यांची माहिती
सिल्लोड : सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील 32 ग्रामपंचायतींच्या कार्यालयाच्या इमारत बांधकामास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेअंतर्गत ही मंजुरी दिल्याची माहिती महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोड सोयगाव मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. या ग्रामपंचायतींना स्वतःच्या मालकीची इमारत असावी असा राज्यमंत्री सत्तार यांचा मानस होता. ग्रामविकास विभागाने सिल्लोड तालुक्यातील 18 आणि सोयगाव तालुक्यातील 14 अशा एकूण 32 ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती इमारत बांधकामास मंजुरी दिल्याने राज्यमंत्री सत्तार यांचा मानस पूर्ण झाला आहे.
हे असणार इमारतींचे वैशिष्ट
मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारत बांधकाम करताना ग्रीन बिल्डींग संकल्पना अमलात आणून, नैसर्गिक प्रकाश योजना व वायुविजन पाण्याच्या व ऊर्जेचा वापरात काटकसर पर्जन्य जल पुन:र्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच इमारतीचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे व बांधकामाचा त्रैमासिक अहवाल वेळेत शासनाकडे पाठवणे गरजेचे असल्याचेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
या गावांमध्ये होणार ग्रामपंचायतीच्या इमारती
मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, पालोद, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, देऊळगाव बाजार, अन्वी, वडोद चाथा, पिंपळगाव पेठ, सिसारखेडा, चिंचखेडा, जळकी वसई, जळकी घाट, खुपटा, जंजाळा, दिडगाव, कायगाव, खंडाळा, पिंपळदरी तसेच सोयगाव तालुक्यातील कवली, माळेगाव पिंपरी, पळासखेडा, फर्दापूर, वरखेडी खुर्द, जामठी, मोलखेडा, सावळदबारा, निमखेडी, तिडका, बोरमाळ तांडा, वाकडी, घोसला, वनगाव बहुरी या गावांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे. देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्यासाठी ग्रामपंचायतींची भूमिकाही तेव्हढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा विकास झाला की देशाचा विकासाला मदत होणार. त्यामुळे कारभार चालवण्यासाठी स्वतःची इमारत असणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाने सिल्लोड सोयगाव मतदार संघात 32 ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत बांधकामास मंजुरी दिली आहे. गावातील लोकांचे कामे तत्परतेने व्हावीत व नागरिकांना डिजिटल सुविधांचा लाभ मिळावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या नवीन ग्रामपंचायती आता सर्व सुविधांनी परिपूर्ण असणार आहेत.
अब्दुल सत्तार, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री