शिंदखेडा येथील भुषण बागुल यांनी कौशल्यात दाखविली दिल्लीत चुणूक देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील बी.के.देसलेनगर रहिवासी असलेल्या भुषण गिरीश बागुल हा विद्यार्थी शिरपूर येथे अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कुलमध्ये दहावी इयत्तेत शिकत असताना त्याने एन.एस.डी.सी.भारत सरकार व सीबीएसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्युनिअर स्किल नॅशनल चॅम्पियन शीप स्पर्धेत सहभागी होवून संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नुकत्याच नवी दिल्ली येथील इंडियन हॅबिटॅट सेंटर ला शानदार सोहळ्यात सीबीएसई चे चेअरमन विनीत जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर विद्यार्थी चिरणे येथील जि.प.शाळा मुख्याध्यापक व शिंदखेडा बी.के.देसलेनगर रहिवासी गिरीश हिलाल बागुल व अनिता गिरीश बागुल यांचा मुलगा होय. प्रथमच एन.एस.डी.सी.भारत सरकार व सीबीएसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्किल ( कौशल्य विकास ) नॅशनल चॅम्पियन शीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत शिरपूर येथील अमरीशभाई आर.पटेल सीबीएसई स्कुलमध्ये दहावी इयत्तेत शिकणाऱ्या भुषण गिरीश बागुल हया विद्यार्थ्याची निवड केली.आणि सहभाग नोंदविला होता. त्यानुसार स्पर्धेच्या चार पात्रता फेरी झाली. प्रथम फेरीत संपुर्ण भारतातुन अडीच लाखांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. ही फेरी १७ जुलै २०२१ रोजी पार पडली यातुन ३१ जुलै च्या दुसऱ्या फेरीसाठी १२५० पात्र स्पर्धकांची निवड करण्यात आली.
तिसऱ्या फेरीत ( २१ आॅगस्ट २१ ) फक्त १५० स्पर्धक पात्र ठरले.त्यानंतर अंतिम फेरी २८ फेब्रुवारी २२ ला घेण्यात आली.त्यात २४ स्पर्धक पात्र ठरत त्यातुन देशातील अंतिम तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यात शिरपूर येथील अमरीशभाई आर.पटेल सीबीएसई स्कुलचा भुषण गिरीश बागुल याची प्रथम क्रमांकाची निवड करण्यात आली. त्याबरोबर झांशी, उत्तरप्रदेश येथील आयुश अवस्थी तर बंगलोर,कर्नाटक येथील रोहन राज या स्पर्धकांची निवड झाली.सदर विजेता स्पर्धकांचा गौरव समारंभ नवी दिल्ली येथील इंडियन हॅबिटॅट सेंटर (आय.एच.सी) हया शानदार हालच्या सोहळ्यात एन.एस.डी.सी.भारत सरकार व सीबीएसई चे चेअरमन विनीत जोशी यांच्या हस्ते भुषण गिरीश बागुल यास मेडल, प्रशस्तीपत्र,तीस हजार रुपये रोख व नॅशनल स्किल किट देवुन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संचालक विश्वजीत सहाय, सेक्रेटरी अतुल तिवारी, सिनियर स्किल कर्नर अरुण चंडेल उपस्थित होते. शिंदखेडा येथील बी.के.देसलेनगर येथील रहिवासी असलेल्या भुषण बागुल याने आपले कौशल्य दाखवित देशात नाव चमकविले ही भुषणावह आहे. सदर स्पर्धकास शिरपुर ते औरंगाबाद व दिल्ली हवाई खर्च तर निवास भोजनाची उत्तम यवस्था सीबीएसई भारत सरकारच्या वतीने मोफत केली होती. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष अमरिशभाई पटेल,सह अध्यक्ष भुपेशभाई पटेल, कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी, सी.ई.ओ.उमेश शर्मा, प्राचार्य निश्चल नायर, व्हा.प्राचार्या अनिता थाॅमस, मार्गदर्शक शिक्षक विनोद अमृतकर यांच्या सह संस्थेचे संचालक व शिक्षक वर्ग तसेच शिंदखेडा येथील सर्व पत्रकार बांधव आणि मित्र परिवार शहर व बी.के.देसलेनगर रहिवासी यांच्या वतीने अभिनंदन केले आहे. सर्वत्र कौतुक केले जात आहे.
माझे स्वप्न डॉक्टर होऊन रिसर्च करण्याचे आहे – भुषण बागुल
मला अमरिशभाई आर.पटेल सीबीएसई स्कुलने माझी भारत सरकार आयोजित ज्युनिअर स्किल नॅशनल चॅम्पियन शीप स्पर्धेसाठी निवड केली हे माझे भाग्य समजतो.ते सार्थ ठरविण्यासाठी मी मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी एम.सी.क्यु.प्रश्नावर आधारित, इंडियन मार्केट सिस्टीम, इंडिजिनियस स्पोर्ट्स आफ इंडिया,जाॅय अन्ड हॅपीनेस या विषयावर कौशल्य सादर केले.भविष्यात मला माझे वडील गिरीश बागुल व आई अनिता बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर होऊन रिसर्च करण्याची इच्छा भुषण याने व्यक केली.