भिम महोत्सव नाचून नव्हे वाचून साजरा केला पाहिजे : प्रा.परेश शाह
शिंदखेड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) सर्वच महापुरुषांच्या जयंती -स्मृतीदिनांना बटबटीत उत्सवी स्वरूप आले आहे. मात्र डॉ.बाबासाहेबांसारख्या महामानवाची जयंती ही वैचारिक कार्यक्रमांनी साजरी व्हावी. म्हणूनच भिम महोत्सव नाचून नव्हे वाचून साजरा केला पाहिजे असे मत प्रा.परेश शाह यांनी व्यक्त केले. येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त 13 एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य ” हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. पहिला गट हा इयत्ता 2 री ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा व दुसरा गट इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा होता. दोन्ही गट मिळून एकूण 26 विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता 2 री ते 8 वी गटातून प्रथम क्रमांक विराट दिपक पाटोळे याने मिळवला. भूमिका रविंद्र पिंपळे या विद्यार्थ्यांनीने व्दितीय क्रमांक मिळविला. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस संविधान विजय मोरे या विद्यार्थ्यांला मिळाले. दुसऱ्या गटातून वैभवी दिनेश मोरे या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.मनीषा मनोहर बोरसे या विद्यार्थिनीला व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तर आदिती दिपक पाटोळे या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांक मिळाला.
या वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्रा. परेश शाह होते. तथागत बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात प्रा. भीमराव कढरे यांनी फूले , शाहू , आंबेडकर विचार मंचची भूमिका स्पष्ट केली. प्रा. रावसाहेब बोरसे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. जी. के. परमार व प्रा. अनिल माळी यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. कमलेश विष्णू पाटोळे यांनी टाइमकीपरची जबाबदारी पार पाडली. प्रा. परेश शाह यांनी आजच्या संवेदनशील काळात फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची अपरिहार्यता स्पष्ट केली. सद्यस्थितीत महापुरुषांमधील मदभेदाबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याची विकृती जडली आहे. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी, बाबासाहेब व पंडित नेहरू यांच्याविषयी गैरसमज हे सत्य समजून घेतल्यानेच दूर होऊ शकतात. त्यासाठी खूप वाचन करण्याची आवश्यकता आहे हे प्रा.शाह यांनी स्पष्ट केले. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. खाजगीकरणामुळे आरक्षणाच्या तत्वालाच धोका पोहचला आहे , हे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश मोरे यांनी केले. भूषण नगराळे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संदिप गिरासे उपस्थित होते. प्रा.भीमराव कढरे, प्रा. भैयाकुमार मंगळे,अक्षय नानाभाऊ पाटोळे, दीपक पाटोळे, गणेश हरी पाटोळे, रावसाहेब बोरसे हे बक्षीसांचे प्रायोजक होते. शैक्षणिक साहित्य व बाबासाहेबांची वैचारिक पुस्तके तसेच संविधानाची प्रत बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना संविधानाची उद्देशिका आणि साधना बालकुमार विशेषांकाचे वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय बिऱ्हाडे, विजय मोरे , रावसाहेब पाटोळे ,भैया दिलीप पाटोळे , पवन बैसाणे, करण थोरात, चंद्रकांत नगराळे, दिपक खंडिजोड, सतीश थोरात, गोपाल शिरसाठ, प्रविण पाटोळे यानी मोलाचे सहकार्य केले.